🔥 मुरबेकरांचा संताप उसळला — आमदार राजेंद्र गावितांना गावात येऊ देण्यास नकार !
https://youtu.be/hsrVJh4lEsA?si=24pSBBCbXED2KDCy
मुरबे बंदराविरोधातील जनतेचा तीव्र रोष; भूमिपूजनासाठी येणाऱ्या आमदारांना ग्रामस्थांचा विरोध, ग्रामपंचायतीनेही दिले स्पष्टीकरण
पालघर : मुरबे बंदर प्रकल्पाविरोधातील जनतेचा संताप आज उफाळून आला. पालघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र गावित यांना मुरबे गावात नागरिकांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. रस्त्याच्या भूमिपूजनासाठी गावित हे एकलारे येथील भूमिपूजन आटोपून मुरबेला येऊ पाहत असता, ग्रामस्थांनी त्यांना गावात येण्यास थांबवले. या संतप्त गर्दीमुळे ग्रामपंचायतीलाही लोकांसमोर याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे भूमिपूजन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मिळाली. मात्र, गावित येणार असल्याची वार्ता समजताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र जमले आणि त्यांनी बंदर प्रकल्पाविरोधातील संताप व्यक्त करत गावितांना येण्यापासून रोखत भूमिपूजन थांबवले.
मागील जनसुनावणी वेळी आमदार गावित अनुपस्थित असल्याबद्दलच ग्रामस्थ नाराज होते. त्या वेळी लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला होता. आज गुरुवारी त्याच संतापाचा उद्रेक झाला आणि मुरबेकरांनी आमदारांना परस्परच परत पाठवले.
मुरबे जिंदाल विरोधी संघर्ष समितीचे प्रमोद आरेकर, सचिन पाटील, जितेंद्र मेर यांनी ग्रामस्थांच्या कृतीचे समर्थन केले. “मुरबे बंदर धार्जिणे भूमिपूजन होऊ दिले नाही, हे लोकशक्तीचे प्रदर्शन असून ग्रामस्थांनी योग्य कृती केली,” असे म्हटले आहे.