पतपेढीच्या अध्यक्षपदी संतोष पावडे तर रिक्त संचालकपदी मायकल सेबॅस्टियन गोंसालविस यांची बिनविरोध निवड

Date: 2026-01-01
news-banner
पतपेढीच्या अध्यक्षपदी संतोष पावडे तर
 रिक्त संचालकपदी मायकल सेबॅस्टियन गोंसालविस
यांची बिनविरोध निवड

https://youtu.be/sqCp93tCkEk?si=K3vHPlK3HUb0O5NG

पालघर, दि. ३१ डिसेंबर :
पालघर–ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ सहकारी पतपेढीच्या झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी संतोष पावडे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच वसई विभागातील रिक्त संचालकपदी संघटना व पतपेढी समन्वयक मायकल सेबॅस्टियन गोंसालविस यांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक असलेले संतोष पावडे हे शिक्षक संघटना तसेच विविध सामाजिक संघटनांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. यापूर्वी त्यांनी सहा वर्षे पतपेढीचे अध्यक्षपद भूषवले असून त्यांच्या कार्यकाळात पतपेढीने आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि सभासदाभिमुख धोरण यामुळे राज्यात आदर्श पतसंस्था म्हणून ओळख निर्माण केली आहे.
पालघर व ठाणे अशा दोन जिल्ह्यांत कार्यरत असलेल्या या सहकारी पतपेढीचे सध्या सुमारे २७०० सभासद असून सुमारे १७० कोटी रुपयांचे भागभांडवल आहे. पतपेढीचे कार्यक्षेत्र पालघर व ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मिरा–भाईंदर, वसई, विरार, पालघर, डहाणू, तलासरी, जव्हार आणि वाडा तालुक्यांतील माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपर्यंत विस्तारलेले आहे.
पतपेढीच्या मालकीची भाईंदर, वसई, सफाळे, पालघर आणि डहाणू येथे स्वतंत्र कार्यालये असून पालघर येथील वळण नाका, माहिम रोड परिसरात मध्यवर्ती कार्यालयासह भव्य सभागृह उभारलेले आहे. पगारदार कर्मचारी वर्गासाठी आदर्श सहकारी संस्था म्हणून पतपेढीचा लौकिक राज्यभर आहे.
सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात गेली ३५ वर्षे कार्यरत असलेले संतोष पावडे यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड झाल्याने पतपेढीचा विकासात्मक, पारदर्शक व सभासदाभिमुख कारभार अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा सभासद शिक्षक वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Leave Your Comments