नवयुग पालघर विशेष
**डहाणू–खारबाव दरम्यान मालगाड्या समर्पित रेल्वे मालवाहतूक (डीएफसी) मार्गावर; पश्चिम रेल्वेवर मोठे परिवर्तन होण्याची अपेक्षा**
पालघर/ठाणे, दि. ३१ मार्च २०२६ — पश्चिम रेल्वेसाठी तसेच या भागासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी मोठी घडामोड घडली असून डहाणू ते खारबाव(ठाणे) दरम्यान धावणाऱ्या मालगाड्या आता मुख्य मार्गावरून (मेन लाईन) हटवून समर्पित रेल्वे मालवाहतूक मार्ग (‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’ )(DFC) मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. आजपासून ( मंगळवार, ३१ मार्च ) वैतरणा ते खारबाव दरम्यान समर्पित रेल्वे मालवाहतूक मार्ग सुरू करण्यात आल्याने या पट्ट्यातील रेल्वे वाहतुकीत मोठे परिवर्तन घडून येणे अपेक्षित आहे.
भारतीय रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी ‘पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर’ (WDFC) प्रकल्पांतर्गत हा टप्पा पूर्ण झाला आहे. एप्रिल २००६ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती, तर ३० ऑक्टोबर २००६ रोजी ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ (DFCCIL) ची स्थापना करून अंमलबजावणीला सुरुवात झाली होती.
हा मार्ग उत्तर प्रदेशातील दादरी (दिल्लीजवळ) येथून सुरू होऊन महाराष्ट्रातील नवी मुंबई येथील जवाहरलाल नेहरू बंदर (JNPT) पर्यंत पसरलेला असून त्याची एकूण लांबी सुमारे १,५०६ किलोमीटर आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या पाच राज्यांमधून अर्थातच आपल्या भागाचा उल्लेख करायचा तर पालघर जिल्ह्यातून हा मार्ग जातो.
या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे प्रवासी आणि मालवाहतूक गाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून देणे, ज्यामुळे मालवाहतुकीचा वेग वाढेल तसेच लॉजिस्टिक खर्च कमी होईल. आतापर्यंत दादरी ते संजाण (गुजरात) हा मार्ग कार्यान्वित झाला होता. आता खारबाव ते न्यू उंबरगाव (संजाण) दरम्यानचे काम पूर्ण झाल्याने खारबावपासून दिल्लीपर्यंत थेट मालगाड्या धावण्याचा मार्ग पूर्णपणे तयार झाला आहे.
या बदलाचा पश्चिम रेल्वेवर मोठा सकारात्मक परिणाम अपेक्षित आहे. यापूर्वी या मार्गावर दररोज सुमारे ५० मालगाड्या मुख्य लाईनवरून धावत होत्या.
तसेच, समर्पित रेल्वे मालवाहतूक मार्गावर डबल स्टॅक कंटेनर ट्रेनसारख्या लांब आणि जड मालगाड्या चालवणे शक्य होणार असून औद्योगिक क्षेत्रासाठीही ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. गुजरातमधील पिपावावसारखी बंदरे आणि तारापूर औद्योगिक क्षेत्र सारखी विविध औद्योगिक केंद्रे या कॉरिडॉरमुळे अधिक सक्षमपणे जोडली जाणार आहेत.हा मार्ग पालघर जिल्ह्यातील तलासरी ते वैतरणा या भागातून जातो व याअंतर्गत न्यू सफाळे, न्यू पालघर ही रेल्वे स्थानके आहेत
एकूणच, डहाणू ते खारबाव दरम्यान समर्पित रेल्वे मालवाहतूक मार्ग सुरू होणे ही राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची घटना ठरत असून रेल्वे वाहतुकीत गती, कार्यक्षमता आणि नियोजनबद्धता आणण्याच्या दृष्टीने हा मोठा टप्पा ठरणार आहे.
( सहकार्य : दयानंद पाटील )