नवयुग पालघर विशेष
**जिल्ह्यात रोहयो मजुरांची केंद्र सरकारकडून ४७ कोटी, एकूण ५० कोटीहून अधिक मजुरी थकीत**
ग्रामीण भागातील मजुरांसाठी जीवनरेखा मानल्या जाणार्या मनरेगा (जी राम जी ) ५० कोटी १८ लाख ५७ हजार ५२ रुपये मजुरी थकीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक महिन्यांपासून मजुरी न मिळाल्याने कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आला असून परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे.
यामध्ये १०० दिवसांच्या आत देय असलेल्या केंद्र सरकारच्या वाट्यातील ४७ कोटी १० लाख १४ हजार ७८४ रुपये, तर १०० दिवसांवरील राज्य सरकारच्या वाट्यातील ३ कोटी ७ लाख ६२ हजार ६८ रुपये मजुरी थकीत आहे.
तालुकानिहाय थकबाकी पाहिली असता परिस्थिती अधिकच चिंताजनक दिसते. विक्रमगड : १६ कोटी ९१ लाख ३७ हजार ६७६ ; जव्हार : १२ कोटी ८८ लाख ५२ हजार ३४१ ; वाडा : १० कोटी ५ लाख ८६ हजार ६८६ ; मोखाडा : केंद्र ४ कोटी २१ लाख २० हजार ९१२ + राज्य ११ लाख ६९ हजार ९२२ ; डहाणू : ३ कोटी २९ लाख ८४ हजार ९२२ ; पालघर : १ कोटी २५ लाख २४ हजार ३६७ ; तलासरी : ९१ लाख ४५ हजार १६५ ; वसई : ५३ लाख ३४ हजार ७९१ ही सर्व आकडेवारी दर्शवते की, जिल्ह्यातील विशेषत: आदिवासी व दुर्गम भागातील मजूर मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
जी राम जी ही योजना ग्रामीण व आदिवासी भागातील लोकांना हमीदार रोजगार देण्यासाठी राबवली जाते. मात्र प्रत्यक्षात काम करूनही मजुरी महिनोन्महिने मिळत नसल्याने मजुरांमध्ये तीव्र नाराजी आहे. अनेक कुटुंबांना रोजच्या जगण्यासाठी बाहेर हात पसरावे लागत आहेत, तर काहींना स्थलांतराचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. केंद्र सरकारकडून आदिवासी विकास आणि रोजगार हमी योजनांबाबत मोठ्या घोषणा केल्या जातात; परंतु पालघर जिल्ह्यातील हे वास्तव त्या दाव्यांना छेद देणारे आहे. कागदावरच्या योजनांपेक्षा प्रत्यक्षात मजुरांच्या हातात वेळेवर पैसा पोचणे महत्त्वाचे असल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, प्रशासनाने थकीत मजुरी अदा करावी, अन्यथा या प्रश्नावर तीव्र आंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केंद्र शासनाने अलीकडेच मनरेगाचं नाव बदलून जी रामजी असे नाव दिले आहे. थकलेल्या मजुरीमध्ये ७५ टक्के हून अधिक वाटा केंद्राकडील थकलेल्या मजुरीचा आहे. डहाणू तालुक्यातील केंद्राकडे थकलेल्या मजुरीची रक्कम ३ कोटी २७ लाख ३ हजार ६९३ तर राज्याकडे थकलेल्या मजूरीची रक्कम २ लाख ८१ हजार २२९ आहे. जव्हार मध्ये केंद्राकडील थकलेल्या मजुरीची रक्कम ११ कोटी २९ लाख ३१ हजार ८९४ तर राज्याकडे थकलेल्या मजूरीची रक्कम एक कोटी ५९ लाख २० हजार ४४७ एवढी आहे. मोखाडा तालुक्यातील केंद्राकडे थकलेल्या मजुरीची रक्कम ४ कोटी २१ लाख २० हजार ९१२ तर राज्याकडे थकलेल्या मजूरीची रक्कम ११ लाख ६९ हजार ९२२ इतकी आहे. पालघर तालुक्यातील केंद्राकडील थकलेल्या मजूरीची रक्कम १ कोटी २२ लाख ४६ हजार ४९५ तर राज्याकडील थकलेला मजुरीची रक्कम २ लाख ७८ हजार १४२ आहे. तलासरी तालुक्यातील केंद्राकडे थकलेल्या मजुरीची रक्कम ९० लाख ८९ हजार ६४७ तर राज्याकrल रक्कम ४५ हजार ५१८ इतकी आहे. वसई तालुक्यातील केंद्राकडील थकलेल्या मधील रक्कम ५३ लाख ३४ हजार ७९१ इतकी आहे.
विक्रमगड तालुक्यातील केंद्राकडे थकलेल्या मजुरीची रक्कम १६ कोटी २५ लाख ५१ हजार ७१३ तर राज्याकडे थकलेल्या मजुरीची रक्कम ६५ लाख ८५ हजार ९६३ आहे. वाडा तालुक्यातील केंद्राकडील मधील थकलेली रक्कम ९ कोटी ४१ लाख ५ हजार ६३९ तर राज्याकडील थकलेली रक्कम ६४ लाख ८१ हजार ४७ इतकी आहे.