**सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन;
विद्यार्थ्यांना नवी संधी**
स्पर्धात्मक परीक्षांमध्ये ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा आणि त्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात रोटरी क्लबच्या साहाय्याने उभारलेल्या अत्याधुनिक स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट आणि रोटरी क्लब पालघर यांच्या संयुक्त पुढाकारातून सुमारे ७० लाख रुपयांच्या निधीतून हे केंद्र उभारण्यात आले असून, सुमारे १६०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या या वातानुकूलित केंद्रात ५० संगणक, झेरॉक्स मशीन, सुसज्ज वाचनालय व स्वतंत्र क्लासरूमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक संधी ठरणार आहे.
उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टच्या अध्यक्षा प्रज्ञा मेहता यांनी शिक्षणासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणे हे सामाजिक संस्थांचे आद्य कर्तव्य असल्याची भावना व्यक्त केली . “स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र हे एक रोपटं आहे; त्याचे जतन आणि संवर्धन संस्थेने करणे आवश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या.
अध्यक्षीय समारोपात संस्थेचे अध्यक्ष सचिन कोरे यांनी संस्थेच्या विकासाचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संस्थेची कटिबद्धता व्यक्त केली. शिक्षणातील उणिवा दूर करण्यासाठी मिळालेली आर्थिक मदत प्रभावीपणे वापरण्याचे आवाहन त्यांनी केले.
या केंद्रामार्फत विविध स्पर्धा परीक्षांची माहिती, अभ्यासाचे नियोजन, तसेच तयारीची दिशा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे पालघर परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करण्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
रोटरी क्लब पालघरचे अध्यक्ष संजय महाजन यांनी आपल्या स्वप्नातील हा उपक्रम प्रत्यक्षात आल्याचा आनंद व्यक्त करत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी रोटरी क्लबच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत या उपक्रमाचे स्वागत केले. प्रकल्पाचे प्रमुख व रोटरी डिस्ट्रिक्टचे चीफ कोऑर्डिनेटर भगवान पाटील यांनी पालघर जिल्ह्यात रोटरीतर्फे सुरू असलेल्या शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेत, हे “रोटरी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन ट्रेनिंग सेंटर” विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारे व उज्ज्वल भविष्य घडवणारे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे नमूद केले.
या प्रशिक्षण केंद्रासाठी साई सर्विस प्रायव्हेट लिमिटेड, प्रज्ञा मेहता अँड फॅमिली, इन्फ्लूक्स हेल्थटेक लिमिटेड, आक्री ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड, गुफिक ग्रुप, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट क्रिकेट टीम, सुमंत नाईक अँड फॅमिली, जस्मा इंजिनिअरिंग एलएलपी तसेच साची भाटिया आणि मालविका पॉल आदी उद्योग समूहांनी भरीव आर्थिक सहकार्य केले.
कार्यक्रमास सुकेतू जरीवाला, नीता भाटिया, डॉ. मुनीर चांदीवाला, धीरज मेहता, सुमन नायर, कानिर भाटिया, महेश कोठारी, धृती शाह, सागर घरत यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर दांडेकर, कोषाध्यक्ष मंगेश पंडित, सचिव सुधीर कुलकर्णी, अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपप्राचार्य डॉ. महेश देशमुख आणि डॉ. तानाजी पोळ यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. विवेक कुडू यांनी केले.
यापूर्वी रोटरीच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यामध्ये स.तू. कदम विद्यालय पालघर, पी. जे. हायस्कूल वाडा, डॉ. स.दा. वर्तक विद्यालय बोईसर आणि के. एल. पोंदा हायस्कूल डहाणू येथे प्रत्येकी 50 लाख रुपये खर्च करून *रोटरी इनोव्हेशन लॅब* उभारण्यात आल्या असून तिथे विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, थ्रीडी प्रिंटिंग आणि इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT) हे तांत्रिक विषय शिकवले जातात. तर *रोटरी करियर फाउंडेशन लर्निंग सेंटर* मध्ये जेईई, निट व इतर परीक्षांसाठी पायाभूत तयारी करून घेतली जात आहे.