**“ मच्छीमारांच्या पदरी निराशाच, : प्रश्न सोडवू, परंतु तूर्तास थांबा” – केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचा मच्छीमार शिष्टमंडळाला सल्ला**

Date: 2026-04-02
news-banner
नवयुग पालघर विशेष 

**“ मच्छीमारांच्या पदरी निराशाच,  : प्रश्न सोडवू, परंतु तूर्तास थांबा” – केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचा मच्छीमार शिष्टमंडळाला सल्ला**

               डिझेल दरवाढीमुळे अडचणीत सापडलेल्या मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन देत 
“हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवू, मात्र सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत थोडी प्रतीक्षा करा,” असा सल्ला केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मच्छीमार शिष्टमंडळाला दिला.  दिल्ली भेटीत ठोस काही हाती न लागल्याने मच्छीमारांच्या पदरी निराशाच आली.
            नॅशनल फिशवर्कर्स फोरम (NFF), महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती (MMKS), महाराष्ट्र राज्य मच्छिमार सहकारी संघ आणि ठाणे जिल्हा मच्छिमार सहकारी संघ यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने दिल्ली येथे जाऊन केंद्र सरकारकडे डिझेल दरासंदर्भात मागण्या मांडल्या. या शिष्टमंडळाने केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पाटणा येथे असल्याने भेट होऊ शकली नाही.

         यानंतर खासदार श्रीकांत शिंदे ,हेमंत सवरा आणि नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांतून कर्तव्य भवन येथे केंद्रीय मंत्री पुरी यांची भेट घेण्यात आली. या वेळी मच्छीमारांनी डिझेल “बल्क कॅटेगरी”मधून वगळून पेट्रोल पंपावरील दरानेच डिझेल मिळावे, अशी प्रमुख मागणी मांडली.
तसेच २०२२ मध्ये दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत “मच्छीमार कल्याण निधी अंतर्गत विशेष कॅटेगरी” लागू करण्याबाबतही मागणी करण्यात आली. यावर मंत्री पुरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, “हा प्रश्न माझ्या लक्षात आहे. तो कायमस्वरूपी मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र सध्याची युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता तातडीने निर्णय घेणे शक्य नाही. पुढील आठवड्यात पुन्हा चर्चा करून मार्ग काढू,” असे सांगितले.

             दरम्यान, शिष्टमंडळाची खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानीही बैठक झाली. यावेळी डॉ. हेमंत सावरा आणि नरेश म्हसके उपस्थित होते. “मच्छीमारांचा प्रश्न गांभीर्याने घेतला असून यापूर्वी संसदेतही मांडला आहे. पुढेही पाठपुरावा करून लवकरात लवकर तोडगा काढू,” असे आश्वासन खासदार शिंदे यांनी दिले.
              नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे अध्यक्ष व महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळामध्ये लिओ कोलासो, ज्योती मेहेर, जयकुमार भाय, राजीव कोळी, प्रल्हाद खिचडे, नाझरेथ गोडबोले, अभय घाट्या, प्रमोद पाटील, अजित बोंबुल, डेनिस ज्यू, रुपेश कोळी, अनिल कोळी आणि अलबट कोळी यांचा समावेश होता.

Leave Your Comments