ठाणे-पालघर जिल्हा मध्य. सह. बँकेची निवडणूक २१ जूनला, मतमोजणी २५ जूनला

Date: 2026-06-10
news-banner
नवयुग पालघर 

**ठाणे-पालघर जिल्हा मध्य. सह. बँकेची निवडणूक २१ जूनला, मतमोजणी २५ जूनला**

         दि ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २५ मे ते १ जून २०२६ अशी आहे. अर्जांची छाननी २ जून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ३ जून ठेवण्यात आली आहे. त्याच दिवशी अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होणार आहे.
          राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांनी हा कार्यक्रम प्रसिद्ध केला असून मतदान व मतमोजणी प्रक्रिया जून महिन्यात पार पडणार आहे.
          निवडणुकीसाठी २१ जागांसाठी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये विविध कार्यकारी सहकारी संस्था, महिला प्रतिनिधी, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त भटके, विशेष प्रवर्ग तसेच पालघर व ठाणे जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.
         आवश्यकतेनुसार मतदान २१ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होईल. त्यानंतर २५ जून २०२६ रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी होणार असून निकाल त्याच दिवशी जाहीर केला जाणार आहे.
             निवडणूक प्रक्रियेचे कार्यालय गुरुकृपा हॉल, पहिला मजला, सपशी गृहनिर्माण सोसायटी, गावदेवी मैदान रोड, बोईसर येथे कार्यरत असून सर्व प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे.


बँकेच्या एकूण जागा : २१ आणि मतदारसंघ खालीलप्रमाणे: 
१. प्राथमिक कृषि पतपुरवठा व वि.का. सेवा सह.संस्था, संयुक्त शेती संस्था तसेच धान्य अधिकोष सहकारी संस्था यांचे प्रतिनिधी (ठाणे जिल्हयातील उल्हासनगर वगळता ठाणे व पालघर जिल्हयातील प्रत्येक तालुक्यास एक याप्रमाणे प्रतिनिधीची संख्या १४ राहील.) : जागा १४, मतदार : पालघर ५५; वसई १४; डहाणू ३७; विक्रमगड १६; तलासरी १२;जव्हार १२; मोखाडा १०; वाडा ३५; अंबरनाथ १६;भिवंडी २८; कल्याण डोंबिवली २१; मुरबाड ६६; शहापूर ६३ ; ठाणे शहर/ग्रामीण १३; उल्हासनगर ०
२.पगारदार सेवकांच्या सह. पतसंस्था, नागरी सहकारी संस्था व नागरी बँकांतर्फे मच्छिमार सहकारी संस्था तर्फे, जंगल कामगार सह. संस्था तर्फे, दुग्ध व्यवसायिक सहकारी संस्था तर्फे.: जागा १ मतदार ७५७
३. खरेदी विक्री संघ, प्रक्रिया संस्था व ग्राहक संस्था तर्फे, इतर बिगर शेती संस्था तर्फे, (गृहनिर्माण व इतर संस्था) तर्फे व्यक्तीगत भागधारक, लोकल अॅथॉरिटीज अॅण्ड पब्लीक ट्रस्ट. : जागा १ मतदार २८३५
४. राखीव जागा : १) महिला प्रतिनिधी : जागा २ मतदार ४०२१ ;२) अनु. जाती किंवा अनुसुचित जमातीतील सदस्य : जागा १ मतदार ४०२१ ; ३) इतर मागास वार्गीय सदस्य: जागा १ मतदार ४०२१
४) विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास वर्गातील सदस्य : जागा १ मतदार ४०२१

Leave Your Comments