https://youtu.be/C0KsyBDJm3I?si=aJ1qE-WIX1E7Xulv
📰 “आपण करू शकतो” हा विश्वासच घनकचरा व्यवस्थापनाचे यश — उपायुक्त रामदास कोकरे
घनकचरा व्यवस्थापनावरील जिल्हा परिषदेची कार्यशाळा संपन्न
पालघर, दि. १० ऑक्टोबर २०२५ (जि.प. वार्ता):
‘आपण करू शकतो’ हा विश्वास असेल, तर कोणत्याही गावात वा शहरात घनकचरा व्यवस्थापन निश्चितपणे करता येईल. “घनकचरा व्यवस्थापन हा विषय अवघड नाही, आपली मानसिकता अवघड आहे, अशा शब्दांत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी घनकचरा व्यवस्थापनातील नेमक्या गरजेकडे लक्ष वेधले. यात कचरा वेगळा ठेवणे आणि वेगळा देणे हाच सर्वात सोपा व प्रभावी उपाय आहे असे सुचवताना, शहरातील सार्वजनिक कचरा जोपर्यंत डोळ्यात गेलेल्या कणाप्रमाणे आपल्याला खुपत नाही, तोपर्यंत या समस्येचे निराकरण होणार नाही,” हेही निक्षून सांगताना, यामधील नागरिकांचा सक्रिय व जागरूक जबाबदारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संबंधित विभागाची जबाबदारी अधोरेखित केली.
जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायती, नगरपंचायती व पालिकांसाठी घनकचरा व्यवस्थापनावरील कार्यशाळेचे आयोजन जननायक बिरसा मुंडा सभागृह, जिल्हा परिषद, पालघर येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेत घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे उपायुक्त रामदास कोकरे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.
कोकरे यांनी आपल्या अनुभवातून बोलताना, “घरातच कचऱ्याचे वर्गीकरण करणे, कचरा रस्त्यावर न फेकणे आणि प्लास्टिकचा वापर टाळणे” हे तीन मंत्र शून्य कचरा निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे निदर्शनास आणले. त्यांनी माथेरान, वेंगुर्ला आणि संगमनेर येथे राबविलेल्या यशस्वी उपक्रमांचा उल्लेख करत, वेंगुर्ल्यातील देशातील पहिला प्लास्टिक रस्ता, शंभर टक्के मातीच्या गणेशमूर्ती, पिशव्या बंदीबाबतची जनजागृती आणि शाळांमधून विद्यार्थ्यांना जोडून राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. अशा उपक्रमांची पालघर जिल्ह्यातील अंमलबजावणी शक्य असून यश नक्की मिळेल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रशिक्षणाद्वारे घनकचरा व्यवस्थापनाच्या शाश्वत पद्धती, पुनर्वापर, वर्गीकरण आणि स्थानिक स्तरावरील उपाययोजना याबाबत सखोल मार्गदर्शन देण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अशोक पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पारसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी आपल्या मनोगतात , “घनकचरा व्यवस्थापनासाठी थातूरमातूर उपाययोजना न करता शाश्वत आणि टिकाऊ उपाय राबविणे अत्यावश्यक आहे. या दृष्टीने कोकरे यांचे मार्गदर्शन जिल्ह्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल,” असे सांगितले.
कार्यशाळेत खानिवली ग्रामपंचायतीचे सरपंच भरत हजारे यांनी त्यांच्या गावात राबविलेल्या यशस्वी उपक्रमांविषयी अनुभव कथन केले. तसेच पाणी व स्वच्छता विभागाचे माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार आत्माराम विशे यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या “स्वच्छता ही सेवा” उपक्रमाबद्दल माहिती दिली.
या कार्यशाळेला जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, नगरपरिषद व पालिकांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेमुळे जिल्ह्यातील स्वच्छता उपक्रम अधिक प्रभावी आणि शाश्वतपणे राबविण्यास निश्चितच गती मिळेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
🟩 — जिल्हा परिषद, पालघर