दिव्यांग मुलांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात; “अडचणींवर मात करून मैदानावर उभे राहणे हेच खरे यश” — जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड

Date: 2025-12-10
news-banner
https://youtu.be/CTtJlVwlpZ4?si=zrVuIROW2w3DpPY3

दिव्यांग मुलांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात; “अडचणींवर मात करून मैदानावर उभे राहणे हेच खरे यश” — जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत
बुधवार १० डिसेंबर रोजी आयोजित दिव्यांग मुलांच्या क्रीडा स्पर्धांना आर्यन हायस्कूल मैदानावर उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला. पालघर जिल्ह्यातील १६ शाळांतील एकूण २३६ विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत सहभाग घेत आपले कौशल्य सादर केले.

उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी यावेळी बोलताना, दिव्यांग मुलांच्या शिक्षकांचे विशेष कौतुक व्हायला हवे असे सुचवताना
“जिल्हा परिषद सेस फंडातून शेवटच्या घटकासाठी राबवला जाणारा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असून आपल्या अडचणींवर विजय मिळवत मैदानावर येणे हेच तुमचे खरे यश आहे अशा शब्दांत दिव्यांगांचे कौतूक केले. अशा स्पर्धा मुलांच्या क्षमतेला दिशा देतात आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरतात. जिल्हा प्रशासन अशा उपक्रमांना अधिक व्यापक करण्यासाठी कटिबद्ध असल्याच्या त्या म्हणाल्या.”

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून झाले. विद्यार्थ्यांचा भव्य मार्चपास, क्रीडा शपथ आणि मान्यवरांना दिलेली सलामी सर्वांचे आकर्षण ठरले.

प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे, पोलिस उपनिरीक्षक प्रभा राऊळ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर आदी उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी मनोगत व्यक्त करताना ,
“दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अशा स्पर्धांचे महत्त्व खूप मोठे आहे. आत्मविश्वास वाढवणे, सामाजिक जडणघडण मजबूत करणे आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टी देणे—हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा परिषद पुढेही या उपक्रमांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले .”

या स्पर्धांचे नियोजन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. धावणे, पळत येऊन लांब उडी, जागेवरून लांब उडी, गोळाफेक, स्पॉट बॉल थ्रो अशा विविध क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

यावेळी कर्णबधिर व मूकबधिर विद्यार्थ्यांच्या पूर्वी झालेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरणही मान्यवरांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हसनाळकर यांनी केले. शिक्षकवृंद, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave Your Comments