अंकीय (डिजिटल) जनगणनेसाठी पालघर जिल्हा सज्ज; प्रशिक्षण संपन्न*

Date: 2026-04-10
news-banner
*अंकीय (डिजिटल) जनगणनेसाठी पालघर जिल्हा सज्ज; प्रशिक्षण संपन्न**

              देशाच्या इतिहासातील पहिली अंकीय/संख्यात्मक (डिजिटल) जनगणना ठरणाऱ्या जनगणना २०२७च्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जनगणना प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यासाठी आयोजित तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाने हे अभियान सुरू झाले.

            जिल्हाधिकारी कार्यालयात ६ ते ११ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणात क्षेत्रीय प्रशिक्षकांना डिजिटल डेटा एन्ट्री, मोबाईल अ‍ॅपचा वापर आणि सीएमएम्इएस ( CMMS) पोर्टलवरील कामकाजाबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून घरयादी व घरगणना प्रक्रिया, तसेच प्रगणक आणि पर्यवेक्षकांच्या नियुक्तीविषयीही यावेळी माहिती देण्यात आली. जनगणना कार्यालयातील मिलिंद पाटील, के. एम. भंडारी आणि संतोष वाघ यांनी सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले.

          यावेळीची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असल्यामुळे मोबाईल अ‍ॅपद्वारे माहिती संकलन, डेटा अचूकता आणि नागरिकांशी संवाद साधताना घ्यावयाची काळजी यावर विशेष भर देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. इंदु राणी जाखड आणि उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) तथा जिल्हा जनगणना अधिकारी रणजीत देसाई यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

           जनगणना २०२७ ही देशाची १६ वी जनगणना असून ती अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. प्रथमच नागरिकांना ‘स्वयं-गणना’ (Self Enumeration) करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा पर्याय १ एप्रिल ते १५ मे २०२६ या कालावधीत उपलब्ध असेल. त्यानंतर १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान घरयादी व घरगणना क्षेत्रीय कामकाज पार पडणार असून, दुसऱ्या टप्प्यात नागरिकांची सविस्तर सामाजिक व आर्थिक माहिती संकलित केली जाणार आहे.

             डिजिटल माध्यमातून जलद माहिती प्रसार, जात प्रगणना, स्व-गणना पोर्टल आणि अचूक डेटा संकलन ही या जनगणनेची प्रमुख वैशिष्ट्ये ठरणार आहेत.

             दरम्यान, जनगणनेसाठी घरी येणाऱ्या प्रगणकांना अचूक व प्रामाणिक माहिती देऊन या राष्ट्रीय उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई यांनी केले आहे.

Leave Your Comments