नवयुग पालघर
**ग्रामीण आरोग्य सुधारण्यासाठी माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाची राज्यात सुरुवात**
राज्य सरकारतर्फे ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे महत्तवाकांक्षी अभियान १ एप्रिलपासून राज्यभर राबविण्यात येणार आहे. लोकसहभागातून व्यापक आरोग्य चळवळ उभी करण्याचा या उपक्रमामागील शासनाचा उद्देश असून उपचारांपेक्षा प्रतिबंधावर भर देणे हे या अभियानाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणार्या जिल्हा परिषदेला ५ कोटी, ३ कोटी आणि २ कोटी रुपये अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी दिले जाणार आहेत. पंचायत समितींनाही २ कोटी, १.५ कोटी आणि १.२५ कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांना ७५ लाख रुपयांचा विशेष पुरस्कार, उपआरोग्य केंद्रांना जिल्हा स्तरावर ५ लाख व राज्य स्तरावर २५ लाख रुपये, तर प्राथमिक आरोग्य केंद्रांना जिल्हा स्तरावर १० लाख व राज्य स्तरावर ५० लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. गावांसाठीही जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर अनुक्रमे २५ लाख, १ कोटी व ५ कोटी रुपयांचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
गावपातळीपासून राज्यस्तरापर्यंत आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करत तळागाळातील नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
या अभियानांतर्गत प्रत्येक गावात स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, पोषण यांसारख्या मूलभूत बाबींवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तसेच संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजार, माता-बाल आरोग्य आणि मानसिक आरोग्य या महत्त्वाच्या घटकांचाही समावेश मोहिमेत करण्यात आला आहे. ग्रामीण नागरिकांच्या आरोग्यविषयक सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या अभियानात, ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत सर्व यंत्रणा सक्रिय सहभाग नोंदवणार असून गावागावात आरोग्याबाबत जनजागृती केली जाणार आहे.
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व ग्रामपातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. ठरवलेल्या निकषांनुसार ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणार्या गावांना ‘आरोग्यसंपन्न गाव’ म्हणून गौरविण्यात येणार असून प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन त्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. या अभियानासाठी राज्य सरकारने ८०.७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार असून प्रत्येक गावाला ‘आरोग्यसंपन्न गाव’ हा किताब मिळवण्यासाठी स्पर्धात्मक संधी उपलब्ध होणार आहे.
__________________________________________
*माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान*
'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' हे महाराष्ट्र शासनाचे १ एप्रिल २०२६ पासून सुरू झालेले एक महत्त्वाकांक्षी अभियान आहे. लोकसहभागातून ग्रामीण भागात आरोग्यदायी संस्कृती रुजवणे, उपचारांपेक्षा प्रतिबंधावर (Prevention) भर देणे आणि गाव पातळीवरच दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
•अभियानाची प्रमुख वैशिष्ट्ये:
लोकसहभाग: हे केवळ सरकारी काम नसून एक व्यापक लोकचळवळ आहे .
•प्रतिबंधात्मक आरोग्य: आजार होऊ नयेत यासाठी जनजागृती, स्वच्छता आणि आरोग्यदायी जीवनशैलीवर भर .
•पुरस्कार: उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना 'आरोग्य संपन्न ग्राम' मानांकन व २ ते ५ कोटी रुपयांपर्यंतचे बक्षीस .
•समित्या: या अभियानासाठी राज्य ते ग्रामपंचायत स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
•अभियानांतर्गत समाविष्ट बाबी:
आरोग्य तपासणी: गावातील प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी करणे.
•स्वच्छता व पोषण: पिण्याचे शुद्ध पाणी, घनकचरा व्यवस्थापन आणि पोषणावर भर .
•कॅशलेस उपचार: महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेचा लाभ.
•हे अभियान खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यासाठी गाव पातळीवरील ग्रामसभा आणि ग्रामपंचायत समिती महत्त्वाची भूमिका बजावतील.