नवयुग पालघर
**महागाई व इंधन दरवाढीविरोधात पालघरमध्ये काँग्रेसचे आंदोलन**
वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल तसेच घरगुती गॅसच्या सातत्याने वाढणार्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित विस्कळीत होत असल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी पालघर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील भारत पेट्रोलियम पंप परिसरात आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात करण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पालघर जिल्हा काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष कॅप्टन सत्यम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी कोकण विभागाध्यक्ष शंभू म्हात्रे यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक स्वरूपात कार दोरीने ओढत पेट्रोल पंपापर्यंत आणली. तसेच पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना ‘मेलोडी’ चॉकलेटचे वाटप करून केंद्र सरकारच्या धोरणांवर उपरोधिक टीका करण्यात आली.
यावेळी बोलताना सत्यम ठाकूर यांनी पेट्रोल, डिझेल, एलपीजी व इतर इंधनांच्या वाढत्या दरांमुळे महागाईचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असल्याचे सांगितले. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढल्या असून नागरिकांचे जगणे अधिक कठीण झाले असल्याचा आरोप त्यांनी केला.
आंदोलनस्थळी विविध मागण्यांचे फलक झळकवून केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. इंधन दरांवर नियंत्रण आणून महागाई कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. या आंदोलनाला स्थानिक नागरिकांचाही प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.