🗳️ पालघर नगरपरिषद निवडणूक : प्रारूप मतदार यादी जाहीर
एकूण ५५ हजार ७२४ मतदार; प्रभाग क्रमांक ८ मध्ये सर्वाधिक, तर १२ मध्ये सर्वात कमी मतदार
पालघर, दि. १० ऑक्टोबर :
पालघर नगरपरिषदेच्या १५ प्रभागांसाठीची प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, नगरपरिषदेतील एकूण मतदारसंख्या ५५ हजार ७२४ इतकी आहे. यापैकी २९ हजार २८० पुरुष, २६ हजार ४४२ महिला, आणि दोन इतर मतदार आहेत.
प्रभागनिहाय आकडेवारीनुसार, प्रभाग क्रमांक ८ मध्ये सर्वाधिक ५६२७ इतके मतदार असून, प्रभाग क्रमांक १२ मध्ये केवळ १३५३ इतकेच मतदार आहेत. इतर प्रभागांतील मतदारसंख्या पुढीलप्रमाणे आहे — प्रभाग क्रमांक १ मध्ये २८७०, २ मध्ये ४२१५, ३ मध्ये ३६९९, ४ मध्ये २७८४, ५ मध्ये ४२२४, ६ मध्ये ४४०७, ७ मध्ये ३२०२, ९ मध्ये ३७६४, १० मध्ये ४०५५, ११ मध्ये ४१७५, १३ मध्ये ४१६८, १४ मध्ये ४१७५ आणि १५ मध्ये ३००६ मतदार आहेत.
दरम्यान, ही प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, १३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत नागरिकांना हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहेत. त्यानंतर २८ ऑक्टोबर २०२५ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.
📌 विधानसभा मतदार यादीचाच आधार
राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादीच नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी वापरण्यात येणार आहे. प्रभागनिहाय मतदार यादी तयार करताना विधानसभेच्या यादीतील मतदारांची नावे व पत्ते जसेच्या तसे ठेवले जाणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.