📰 मोखाड्यातील वेठबिगारीचं पुन्हा एक भीषण वास्तव — भावाच्या शोधात गेलेल्याने उजेडात आणली मानवी कैद !

Date: 2025-10-10
news-banner
📰 मोखाड्यातील वेठबिगारीचं पुन्हा एक भीषण वास्तव — भावाच्या शोधात गेलेल्याने उजेडात आणली मानवी कैद !

बीड जिल्ह्यातून २ पुरुष, १ महिला आणि १० बालकांची सुटका; स्थलांतर रोखण्यात अपयशी यंत्रणांवरही प्रश्नचिन्ह


मोखाडा तालुक्यातील डोंगरदऱ्यांत पुन्हा एकदा वेठबिगारीचं विदारक वास्तव समोर आलं आहे. तब्बल १४ जणं — दोन पुरुष, एक महिला आणि दहा बालकं — यांना बीड जिल्ह्यातील तागडगाव (ता. शिरूर) येथील कैदेतून मुक्त करण्यात आलं आहे. ही कारवाई सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांच्या पुढाकारातून करण्यात आली.

ही सुटका एका भावाच्या शोधातून शक्य झाली — मोखाडा तालुक्यातील शेंड्याची मेट, उधळी(हट्टीपाडा) येथील प्रदीप वाघ हा आपल्या भावाचा, पिंटू वाघ (वय ३५), गेल्या काही दिवसांपासून शोध घेत होता. “भाऊ पिंटू वाघ गेल्या चार-पाच वर्षांपासून बीड जिल्ह्यात कामासाठी गेला होता, पण संपर्क होत नव्हता,” असं प्रदीपने सांगितलं. त्याच्याच या शोधातून एका भयानक वास्तवाचा उलगडा झाला.हे सर्वजण कातकरी कुटुंबातील आहेत...


🔍 कैदेतलं आयुष्य — एका कर्जाची बेडी, पिढ्यान्‌पिढ्यांची गुलामी

तपासात उघड झालं की, पिंटू वाघ, त्याची पत्नी संगीता आणि त्यांची तीन मुलं, तसेच प्रकाश गौतरने आणि त्यांची सात मुलं ही सगळी माणसं बीडमधील वेगवेगळ्या गावांतील मालकांकडे “उचल(advance) च्या बदल्यात” वेठबिगार म्हणून अडकली होती.

७ वर्षीय पूजा प्रकाश गौतरने ही मुलगी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी येथील रामहारी आश्रुबा खेडकर यांच्या घरी घरकाम, धुणीभांडी आणि गुरांची देखभाल अशा श्रमात गुंतवली गेली होती.
माधुरी, पायल आणि साईनाथ ही मुलं धर्मराज हिरामण धनवटे यांच्याकडून सोडविण्यात आली.
१० वर्षीय गौरी प्रकाश आणि ३ वर्षीय राणी प्रकाश या मुली मारुती ज्ञानदेव सानप यांच्याकडे तर
सानिका उर्फ चिवडी प्रकाश, ५ वर्षीय रोशन प्रकाश, मुन्नी प्रकाश आणि ऋत्विक प्रकाश ही मुलं वडील प्रकाश गौतरने यांच्यासह नंदू ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून सोडविण्यात आली.

हे तिन्ही मालक — धर्मराज धनवटे, मारुती सानप, नंदू पवार आणि रामहारी खेडकर — तागडगाव, तालुका शिरूर, जिल्हा बीड येथील असून त्यांच्यावर शिरूर (बीड) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील काही बालिका स्थानिक नागरिकांना (यात निवृत्त अधिकारीही असल्याचे समजते) १५ हजार रुपयांत विकल्या गेल्याचंही धक्कादायक वास्तव पुढे आलं आहे. त्या मुलींना घरकाम, गुरांची देखभाल, वृद्धांची सेवा अशा अमानुष श्रमांमध्ये अडकवण्यात आलं होतं.


🧩 पार्श्वभूमी — मे २०२५ मधील ७२ वेठबिगारांची सुटका

या घटनेने काही महिन्यांपूर्वीच्या, म्हणजेच मे २०२५ मधील मोठ्या सुटकेची आठवण पुन्हा ताजी केली आहे. त्यावेळी मोखाडा तालुक्यातील ६२ आणि नाशिक जिल्ह्यातील १० अशा एकूण ७२ वेठबिगारांची मुक्तता करण्यात आली होती. त्या वेळीही “भाऊ आपल्या बहिणीच्या शोधात” निघाला आणि त्यातून वेठबिगारीचं संपूर्ण जाळं उघड झालं होतं.
पण या नंतरही स्थलांतर आणि गुलामीचं चक्र थांबलं नाही — हेच आजचं समाजाचं शोकांतिक वास्तव आहे.


🌾 स्थलांतर — मोखाडा आणि जव्हारची कायमची जखम

प्रशासन रोजगार हमी, आदिवासी विकास आणि मनरेगा योजनेची आकडेवारी दाखवत असलं तरी वास्तव वेगळं आहे. मोखाडा-जव्हार परिसरातील शेकडो कुटुंबं दरवर्षी कामाच्या शोधात पर जिल्ह्यांत स्थलांतर करतात. तिथेच त्यांचं शेवटी गुलामगिरीत रूपांतर होतं.

स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासन, आदिवासी प्रकल्प कार्यालय, कामगार विभाग आणि पोलिस यंत्रणांवर उदासीनतेचा आरोप केला आहे.


📣 “ही गुन्हेगारांची नाही, अपयशी यंत्रणांची कहाणी आहे”

सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे म्हणाले —

> “ही केवळ काही लोकांची गुन्हेगारी नाही, तर यंत्रणांच्या अपयशाची कहाणी आहे. स्थलांतर थांबवण्यासाठी ठोस उपाय काय झाले? किती कुटुंबं गावात टिकली, याचा हिशेब कोण देणार? या सर्वांची स्वतंत्र चौकशी झालीच पाहिजे. अन्यथा मोखाडा आणि जव्हारमधील प्रत्येक वस्तीमागे अशीच काही मूक गुलामी सुरू आहे.”


🕯️ मानवी वेदना आणि प्रशासकीय संवेदनशीलतेचा अभाव

मे २०२५ आणि ऑक्टोबर २०२५ मधील या दोन घटना फक्त कायदेशीर प्रकरणं नाहीत — त्या मनुष्याच्या प्रतिष्ठेवरचे थेट प्रश्न आहेत.
गरीबी, कर्ज आणि प्रशासनाचा निष्क्रियपणा या त्रिकोणात अडकलेली आदिवासी कुटुंबं आजही गुलामी जगत आहेत.

भाऊ भावाला, बहीण भावाला शोधत निघते आणि अशा शृंखला उलगडतात — हे चित्र २१व्या शतकातही दिसतं, हीच सर्वात मोठी लाज आहे.


❓आता प्रश्न एकच — मोखाडा मुक्त होईल तेव्हा कधी?

गुलामगिरीच्या साखळ्या तोडण्याचं धैर्य प्रशासन दाखवेल का?
की प्रत्येक सुटकेनंतर काही महिन्यांनी पुन्हा एखादा “भाऊ आपल्या भावाच्या शोधात” निघणार — आणि नव्या गुलामीचा पर्दाफाश होणार?

Leave Your Comments