https://youtu.be/WBswGFrnzhg?si=nKuES6_gGslU4Fod
📰आजारी वृद्ध महिलेला चादरीची डोली बनवून मुख्य रस्त्यापर्यंतचा प्रवास...सफाळे पश्चिम रेल्वे लगतच्या पाड्याचे हाल
गेल्या तीन वर्षांपासून रस्ता बंद — रेल्वे चौपदरीकरणामुळे ग्रामस्थांची कोंडी
सफाळे (प्रतिनिधी) :
सफाळे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील टेपाचापाडा (पाटीलनगर) येथील रहिवाशांना गेल्या तीन वर्षांपासून रस्त्याअभावी हाल सोसावे लागत आहेत. इतकेच नव्हे तर बुधवारी या पाड्यातील एका वृद्ध महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी ग्रामस्थांना चादरीत टाकून जवळपास एक किलोमीटर उचलून मुख्य रस्त्यापर्यंत नेण्याचा प्रसंग ओढवला.
🚧 रेल्वे चौपदरीकरणामुळे मार्गच बंद
विरार–डहाणू चौपदरीकरणाच्या कामामुळे रेल्वेमार्गालगतचा पश्चिमेकडील अंतर्गत रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. हा रस्ता बंद झाल्याने टेपाचापाडा (पाटीलनगर) वस्तीतील नागरिकांचा बाहेर मुख्य रस्त्यापर्यंत येण्याचा मार्गच बंद झाला आहे. याशिवाय, पूर्वेकडील बाजूला असलेला रेल्वे क्रॉसिंग मार्गही समर्पित मालवाहतूक रेल्वेमार्गामुळे कायमचा बंद करण्यात आला आहे. तसेच यापूर्वी पूर्वेकडील रेल्वे मार्गावर थांबणाऱ्या मालगाड्या पश्चिमेकडील रेल्वे मार्गावर थांबून राहत असल्याने, नागरिकांना पश्चिमेकडील बाजूने बाहेर पडण्याचाही मार्ग ( अर्थात धोकादायक व अवैध ) उपलब्ध नाही.
🚑 रुग्णवाहिकेसाठी रस्ताच नाही
बुधवारी सकाळी या वस्तीतील एका वृद्ध महिलेला अचानक अस्वस्थ वाटू लागले. मात्र वाहन आत पोहोचू शकत नसल्याने ग्रामस्थांनी चादरीत टाकून तिला सुमारे एक किलोमीटर अंतर उचलत मुख्य रस्त्यापर्यंत आणले. त्यानंतर तिला विरार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
🧱 दैनंदिन जीवनातही अडथळे
या भागातील नागरिकांना केवळ आपत्कालीन प्रसंगीच नव्हे, तर दैनंदिन प्रवास, नोकरी, बाजारहाट, शाळा अशा प्रत्येक गोष्टीसाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. काही पर्यायी रस्ते खाजगी जमिनीतून जात असल्याने जमीनमालकांकडून निर्माण होणारे अडथळेही वाढत आहेत. चौपदरीकरणामुळे रस्ता तयार होईल या अपेक्षेने नागरिकांनी धीर धरला होता, मात्र तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही समस्या कायम आहे.
🗣️ लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे वारंवार तक्रारी — पण प्रतिसाद नाही
ग्रामस्थांनी या संदर्भात वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. "रस्ता न मिळाल्याने आम्ही कोंडीत सापडलो आहोत, प्रशासनाने आता तरी लक्ष द्यावे," अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
➡️ ग्रामस्थांची मागणी:
तातडीने पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा
चौपदरीकरणानंतरच्या अडथळ्यांवर समन्वयाने उपाययोजना कराव्यात
रेल्वे व स्थानिक प्रशासनाने संयुक्तपणे कायमस्वरूपी रस्ता निर्माण करावा