पालघर नगरपरिषद मतदार यादीत घोळ — राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेकडून निवडणूक आयोगाकडे तक्रारी

Date: 2025-10-11
news-banner
पालघर नगरपरिषद मतदार यादीत घोळ — राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेकडून निवडणूक आयोगाकडे तक्रारी

पालघर, दि. ११ ऑक्टोबर :
पालघर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर त्रुटी, विसंगती आणि नियमबाह्य बदल झाल्याचा गंभीर आरोप दोन प्रमुख पक्षांनी — राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक अधिकारी व राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार नोंदवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप : “नियमबाह्य पद्धतीने यादी तयार”

पालघर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अनिल माधवराव गावड यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, पालघर नगरपरिषद निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादी ही राज्य निवडणूक आयोगाच्या १६ जुलै व ३० सप्टेंबर २०२५ रोजीच्या आदेशांचे उल्लंघन करून तयार करण्यात आली आहे.

तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की, ७४४ मतदार इतर प्रभागांतील समाविष्ट करण्यात आले आहेत.
मुख्याधिकारी, नगरपरिषद प्रशासन यांनी या विसंगतीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले, असा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
गावड यांनी आयोगाकडे मागणी केली आहे की, “नियमबाह्य पद्धतीने तयार झालेल्या याद्या रद्द करून, आयोगाच्या आदेशांचे तंतोतंत पालन करत सुधारित मतदार याद्या प्रसिद्ध कराव्यात.”

मनसेची भूमिका : “यादीत मोठा घोळ, नागरिकांना अन्याय”

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर शहर अध्यक्ष निशांत शरद धोत्रे यांनीही मतदार यादीतील गंभीर त्रुटींवर आक्षेप घेत निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मनसेच्या तक्रारीनुसार यादीत खालील बाबी आढळून आल्या आहेत —

1. अनेक मृत व्यक्तींची नावे अद्यापही यादीत कायम आहेत.

2. मोठ्या प्रमाणात दुबार नावे (double entries) समाविष्ट आहेत.

3. एकाच व्यक्तीचे नाव दोन किंवा अधिक विभागांत आहे.

4. संपूर्ण यादीत कोणत्याही मतदाराचा फोटो नाही, त्यामुळे ओळख पटविणे कठीण आहे.

5. पूर्व विभागातील नावे पश्चिम विभागात चुकीने दाखल केली गेली आहेत.

6. नगरपरिषदेच्या हद्दीबाहेरील नावे याद्यांमध्ये आहेत.

7. अनोळखी आणि संशयास्पद बोगस मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

8. पत्ते अपूर्ण असून अनेक ठिकाणी फक्त घर क्रमांक, “?” किंवा “NA” अशी चिन्हे दिली आहेत.

9. याद्या एखाद्या राजकीय पक्षाला लाभ होईल अशा पद्धतीने तयार केल्या गेल्या असाव्यात, असा मनसेचा आरोप आहे.

10. आक्षेप नोंदविण्याची मुदत अत्यल्प ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांना तपासणी व दुरुस्तीची संधीच मिळणार नाही.


या पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, निवडणूक अधिकारी आणि नगरपरिषद मुख्याधिकारी यांची भेट घेऊन, आक्षेप नोंदविण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्याची मागणी केली असून, राज्य निवडणूक आयोगालाही ई-मेलद्वारे तक्रार पाठवली आहे.

Leave Your Comments