खासदारांच्या घरावर धडक; इपीएस-९५ पेन्शनधारकांचा घंटानादाने इशारा
पालघर : पालघर जिल्ह्यातील इपीएस-९५ पेन्शनधारकांनी थेट खासदारांच्या घरावर धडक देत आपल्या मागण्यांसाठी जोरदार आवाज उठवला. सातत्याने होणाऱ्या उपेक्षेमुळे हताश झालेल्या पेन्शनधारकांनी नव्या लढ्याचा शंखनाद करत घंटानाद आंदोलनाद्वारे केंद्र शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
गेल्या अनेक वर्षांपासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत विविध मार्गांनी आंदोलने करूनही प्रत्येक अर्थसंकल्पात निराशाच पदरी पडत असल्याची भावना पेन्शनधारकांनी व्यक्त केली. १ फेब्रुवारी रोजी भोपाळ येथे झालेल्या दिशादर्शक बैठकीत आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार विद्यमान खासदार हेमंत सवरा यांच्या वाडा येथील जनसंपर्क कार्यालयासमोर घंटानाद करत पुरवणी अर्थसंकल्पात मागण्यांचा विचार करावा, असे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने निवृत्त उपस्थित होते.
कोशियारी समितीच्या अहवालावर आधारित किमान नऊ हजार रुपये पेन्शन लागू करावी, कोरोनाच्या काळात बंद करण्यात आलेली ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे सवलत पूर्ववत सुरू करावी तसेच ठेवींवर किमान दहा टक्के व्याजदर द्यावा, या प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश करण्यात आला आहे.
खासदार हेमंत सवरा हे अभ्यासू व कार्यक्षम प्रतिनिधी असून जिल्ह्यातील सुमारे ,५० हजार पेन्शनधारकांच्या न्याय्य मागण्यांची दखल घेऊन ते नेतृत्व करतील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष अनिल ताहाराबादकर यांनी व्यक्त केला.
“नको या वयात टेन्शन, आता तरी वाढवा पेन्शन!” या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
सरचिटणीस प्रदीप पाटील, कार्याध्यक्ष अशोक राऊत, खजिनदार रवींद्र कदम, उपाध्यक्ष भगवान सांबरे, शांताराम पाटील, रवींद्र डोहाळे, जे. पी. पाटील, विलास ठाकूर, प्रभाकर पाटील आदींनी निवृत्तांच्या व्यथा मांडल्या.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी शंकर भोये, सुधाकर भरसट, आर. डी. पाटील, शाम आंबेकर, जाऊ पाटील, टी. बी. गायकर, आर. एस. पाटील आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पेन्शनधारकांनी
दिला.