परराज्यातील मद्य तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; ३४.८० लाखांचा मुद्देमाल जप्त*

Date: 2026-06-11
news-banner
नवयुग पालघर

https://youtu.be/SoFakp6_MjY?si=ExPtemOEZpPIFV_h

***परराज्यातील मद्य तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; ३४.८० लाखांचा मुद्देमाल जप्त****

          पालघर जिल्ह्यात परराज्यातून होणाऱ्या मद्य तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत १४२ बॉक्स विदेशी मद्यसाठ्यासह तीन वाहने जप्त केली आहेत. या कारवाईत एकूण ३४ लाख ८० हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, डहाणू व भरारी पथक पालघरयांना मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे डहाणू विभाग व भरारी पथक, पालघर यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. केंद्रशासित प्रदेशातून महाराष्ट्रात होणाऱ्या मद्य तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागाकडून दिवसरात्र गस्त ठेवण्यात येत असताना ११ जून रोजी विविध ठिकाणी सापळे रचून ही कारवाई करण्यात आली.

           ही कारवाई मौजे दहाळे (कासा-सायवन रोड, डहाणू), बेहडपाडा (पो. वावर, जव्हार) आणि सोरळी बेहडपाडा (पो. वावर, जव्हार) येथे करण्यात आली. तपासणीदरम्यान महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच-४८/सीबी-१४४३), मारुती सुझुकी इको (एमएच-०५/बीएच-६६५८) आणि टोयोटा इनोव्हा (एमएच-०१/बीजी-१४९५) या वाहनांमधून दादरा-नगर हवेली राज्यात विक्रीसाठी असलेला आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विदेशी मद्यसाठा आढळून आला.

           या प्रकरणी सी.आर. क्र. १३१/२०२६, १३२/२०२६ आणि १३८/२०२६ असे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. जप्त मुद्देमालामध्ये १४२ बॉक्स विदेशी मद्याचा समावेश असून त्याची किंमत १० लाख १० हजार ५२० रुपये आहे. मद्य वाहतुकीसाठी वापरलेली महिंद्रा बोलेरो पिकअप (१० लाख रुपये), मारुती इको (५.२० लाख रुपये) आणि टोयोटा इनोव्हा (९.५० लाख रुपये) अशी वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.

            ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, पालघरचे अधीक्षक गणेश बारगजे आणि उपअधीक्षक अविनाश रणपीसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

           कारवाईत डहाणूचे निरीक्षक सुनील देशमुख, भरारी पथक पालघरचे निरीक्षक अरुण चव्हाण, दुय्यम निरीक्षक राजेश एस. शिंदे, विश्वजीत एम. आभाळे, विकास आबनावे, अभिजीत मानकर, टी. व्ही. सावेकर तसेच जवान संदीप अहिरे, ओमकार शेजवळ, अमोल नलावडे, दीपक शेवाळे, प्रतिक गांगुर्डे, वाहनचालक शशी आणि इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

           या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक सुनील देशमुख, निरीक्षक अरुण चव्हाण आणि दुय्यम निरीक्षक विश्वजीत आभाळे करीत आहेत.

Leave Your Comments