https://youtu.be/09cjDNIaZ3o?si=ukc8sEQaCKJUvpsk
🏆 कराटेच्या विश्वात पालघरचा उदयोन्मुख तारा — प्रशिल कविता अजय जाधव!
आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकलेले १४ वर्षीय कराटेपटूचे यश; ४४ सुवर्ण, ५ रजत, ३ कांस्य पदकांची कमाई
पालघर :
टेंभोडे (ता. व जि. पालघर) येथील प्रशिल कविता अजय जाधव हा जिल्ह्यातील कराटे विश्वातील एक झपाटलेले आणि उल्लेखनीय नाव ठरत आहे. अवघ्या ८ व्या वर्षी कराटेच्या मैदानात पदार्पण केलेल्या प्रशिलने आजपर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ४४ सुवर्ण, ५ रजत आणि ३ कांस्य पदकांची कमाई केली आहे. तसेच शालेय स्पर्धांमध्येही त्याने १० सुवर्ण, ३ रजत आणि २ कांस्य पदके पटकावली आहेत.
गेल्याच वर्षी शाळेतील ‘बेस्ट अथलेटिक्स बॉय’ म्हणून गौरविण्यात आलेल्या प्रशिलने ऑल महाराष्ट्र कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन सुवर्ण पदके मिळवली. त्याहून विशेष म्हणजे खुल्या कुमिते (फाईट) प्रवर्गात खेळताना अवघ्या १४ व्या वर्षी २४ वर्षांच्या प्रतिस्पर्ध्यांना हरवत सुवर्णपदक व ट्रॉफी आपल्या नावे केली.
१५ नोव्हेंबर २०२४ रोजी गोवा, मापसा येथे झालेल्या २४व्या FSKA वर्ल्ड कप चॅम्पियनशिपमध्ये प्रशिलने भारतासाठी दोन सुवर्ण पदके पटकावली. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकाने प्रशिलच्या कामगिरीची विशेष दखल घेत त्याचे कौतुक केले. इतकेच नव्हे, तर त्यांनी प्रशिलला भविष्यात दक्षिण आफ्रिकेत कराटे क्लास चालविण्याची आणि नोकरीची संधी देण्याचे आश्वासन दिले.
शालेय स्पर्धांमध्येही प्रशिलने दमदार कामगिरी केली आहे. अंडर-१७ गटातील तालुका, जिल्हा आणि झोनल स्तरावर सुवर्ण पदक मिळवत त्याने धुळे येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. या यशानंतर प्रशिलने दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व केले. त्या स्पर्धेत त्याने गोवा संघाला पराभूत केले, तर आसामविरुद्ध थोड्याशा फरकाने पराभव पत्करावा लागला.
त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी दांडेकर कॉलेज तर्फे त्याला ‘प्लेयर ऑफ द इयर’ ही ट्रॉफी प्रदान करण्यात आली. त्याचबरोबर, त्याचा फोटो कॉलेज जिममध्ये लावण्यात येणार असल्याची घोषणा प्रा. किरण थोरात यांनी संपूर्ण कॉलेजसमोर केली.
अलीकडेच, १४ सप्टेंबर रोजी मुलुंड येथे संपन्न झालेल्या ३६व्या ऑल इंडिया WFSKO चॅम्पियनशिपमध्ये प्रशिलने पुन्हा एकदा आपली चमक दाखवली. या स्पर्धेत त्याने काता प्रकारात रजत पदक तर कुमिते प्रकारात सुवर्ण पदक मिळवले. तसेच खुल्या ग्रँड चॅम्पियनशिपमध्येही वयाने मोठ्या खेळाडूंना पराभूत करत ट्रॉफी आपल्या नावे केली.
या सर्व यशामध्ये त्याचे प्रशिक्षक शिहान प्रतीक राऊत आणि सेंसेई संदीप वेंगुर्लेकर (वेंगुर्लेकर कराटे क्लास, पालघर) यांचे मार्गदर्शन अनमोल ठरले आहे. प्रशिल हा वेंगुर्लेकर कराटे क्लासचा विद्यार्थी असून त्याने आपल्या मेहनतीने पालघरचा लौकिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावला आहे.