प्रदुषणाविरोधात तक्रार करणार्यांवर अमानुष हल्ला
बोईसर औद्योगिक परिसरातील गो-ग्रीन कंपनीजवळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) अधिकार्यांसमोरच दोघांवर लोखंडी रॉड व बांबूच्या काठ्यांनी अमानुष मारहाण केल्याची गंभीर घटना गुरुवारी दुपारी घडली. या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात सात ते दहा जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत जितम राजेंद्र घरत (रा. धनसार, पालघर), गंभीर जखमी झाले असून त्यांना बोईसर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत असलेले नातेवाईक सुरज मेघन पाटील (वय २६, रा. सरावली देखील या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ११ डिसेंबर रोजी दुपारी सुरज पाटील हे घरी असताना त्यांचे आतेभाऊ जितम घरत यांनी फोन करून प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात जाण्यास सांगितले. त्यानुसार सुरज पाटील हे जितम घरत यांना घेऊन सिडको, बोईसर येथील या कार्यालयात गेले. तेथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण
मंडळाचे अधिकारी लोने आणि एक पत्रकार उपस्थित होते. यानंतर एमपीसीबी अधिकार्यांनी गो-ग्रीन कंपनीचे लोकेशन दाखविण्यास सांगितल्याने सर्वजण कंपनीच्या दिशेने रवाना झाले.
दुपारी साडेतीनच्या सुमारास गो-ग्रीन कंपनीच्या गेटजवळ पोहोचताच अचानक राजेश पाटील हा स्कूटीवरून आला आणि जितम घरत यांना शिवीगाळ करत कानाखाली मारहाण केली. काही क्षणांतच मुकेश पाटील तेथे आला आणि त्यानेही घरत यांना थपडा मारण्यास सुरुवात केली. हल्ला वाढत चालल्याने जितम घरत हे जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर पळू लागले. याचवेळी कंपनी परिसरातून तुफान, मुस्तफा उर्फ मुसा, संतोष धोडी तसेच अन्य चार-पाच जण बाहेर आले. त्यानंतर सर्वांनी मिळून जितम घरत यांच्यावर लोखंडी रॉड व बांबूच्या काठ्यांनी पाय, हात, डोके व संपूर्ण शरीरावर बेदम मारहाण केली. जवळपास अर्धा तास हा हल्ला सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, सुरज पाटील हे गाडी घेऊन निघण्याचा प्रयत्न करत असताना राजेश पाटील यांनी त्यांची गाडी अडवून चावी व मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर तुफान याने सुरज पाटील यांना गाडीतून खाली उतरवून रॉडने हात, पाय व बरगड्यांवर मारहाण केली. संतोष धोडी याने कानशिलात मारून त्यांना रस्त्यावर बसवून ठेवले. घटनेनंतर आरोपींनी पोलिसांना बोलावून दोघांनाही घटनास्थळी बसवून ठेवले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोघा जखमींना ग्रामीण रुग्णालय, बोईसर येथे उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर जितम घरत यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शगुन हॉस्पिटल, बोईसर येथे दाखल करण्यात आले.
या प्रकरणी सुरज पाटील यांनी बोईसर पोलीस ठाण्यात हजर राहून राजेश पाटील, मुकेश पाटील, मुस्तफा उर्फ मुसा, तुफान, संतोष धोडी व इतर ४ ते ५ जणांविरोधात तक्रार दाखल केली असून आरोपींवर भारतीय न्याय संहिता अंतर्गत १२६(२), ११८(१), ११५(२), १८९(२), १९१(२), १९१(३)व १९० अशी कलमं लावली आहेत. पुढील तपास बोईसर पोलीस करीत आहेत.