पालघरमध्ये सुरेल जल्लोष — कराओके गायन स्पर्धेत ज्ञानेश्वर दळवी प्रथम
https://youtu.be/eliBNct2baE?si=xHbnpcvF_eBr5MAV
पालघर (प्रतिनिधी):
मर्मबंध साहित्य व कला संस्था आयोजित कराओके गायन स्पर्धेत पालघरच्या ज्ञानेश्वर दळवी यांनी आपल्या दमदार, भावपूर्ण गायनाने प्रथम क्रमांक पटकावत रसिकांची मने जिंकली. १२५ स्पर्धकांमधून अव्वल ठरणाऱ्या दळवी यांना २,००० रुपये व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा ९ जानेवारी रोजी पालघर लायन्स क्लब येथे उत्साहात पार पडली.
पालघर जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या गुणवान गायकांनी या स्पर्धेत सहभाग घेत मराठी व हिंदी गीतांची बहारदार मैफल रंगवली. संपूर्ण सभागृह संगीताने भारावून गेले होते. रसिकांची मोठी उपस्थिती आणि दाद या कार्यक्रमाला लाभली .
स्पर्धेचे परीक्षण शास्त्रीय संगीत गायक नीरज लांजेवार आणि कराओके स्पर्धांचे नामवंत परीक्षक सोनाली भावे यांनी केले. त्यांच्या कसोशीच्या परीक्षणानंतर द्वितीय पारितोषिक उमेश राऊत यांनी (₹१५०० व स्मृतिचिन्ह) तर तृतीय पारितोषिक मानसी हिरे हिने (₹१००० व स्मृतिचिन्ह) पटकावले.
उत्तम गायनासाठी देण्यात आलेली उत्तेजनार्थ पारितोषिके रुपेश राऊत आणि राजेश गायकवाड यांनी जिंकली.
त्यांना प्रत्येकी ₹५०० व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाला पालघर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार रमाकांत पाटील, इनर व्हील क्लबच्या अनुश्री आव्हाड, संगीत शिक्षिका हर्षाली मुकणे लोखंडे, सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळ पालघर संस्थेचे अध्यक्ष सचिन कोरे, तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. स्पर्धकांच्या संख्येच्या मर्यादेमुळे सचिन कोरे स्पर्धेत भाग घेऊ शकले नाही. मात्र त्यांनी गायलेल्या ...“जीना यहाँ, मरना यहाँ” या
गाण्याला उपस्थितांची छान दाद मिळाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मर्मबंध साहित्य व कला संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेच्या अध्यक्षा नम्रता माळी पाटील, सचिव सुहास राऊत, खजिनदार नितेश पाटील तसेच कार्यकारिणी सदस्य व स्पर्धा संयोजक अनिल करवीर यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला. स्पर्धेचे सूत्रसंचालन अनिल करवीर व शबाना व्हिक्टर यांनी केले.
मर्मबंध साहित्य व कला संस्थेच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून, अशा व्यासपीठांमुळे नवोदित कलाकारांना संधी मिळून पालघरच्या सांस्कृतिक चळवळीला नवी ऊर्जा मिळत असल्याची भावना उपस्थित रसिकांनी व्यक्त केली.