**१ मेपासून पालघर जिल्ह्यात जनगणना २०२७ ला सुरुवात; डिजिटल पद्धतीने दोन टप्प्यांत प्रक्रिया**
भारताची १६ वी जनगणना असलेली जनगणना २०२७ ही १ मे २०२६ पासून पालघर जिल्ह्यात सुरू होत असून, ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात मोबाईल अॅप आणि CMMS पोर्टलच्या माध्यमातून दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देत जिल्हा प्रशासनाने यासाठी तयारी पूर्ण केली असल्याचा विश्वास व्यक्त केला.
जिल्ह्यातील ८ तालुके, ३ नगरपरिषद आणि ४ नगरपंचायती मिळून (यात वसई मनपाचा समावेश नाही)एकूण १५ चार्ज कार्यालयांमार्फत सुमारे २४.३० लाख लोकसंख्येची गणना केली जाणार आहे. यासाठी ३७१८ प्रगणक व ६३६ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले असून ३४०१ घरयादी गट तयार करण्यात आले आहेत.
जनगणना प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात १ ते १५ मे दरम्यान नागरिकांना https://se.census.gov.in� या संकेतस्थळावर स्व-गणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्व-गणना पूर्ण केल्यानंतर मिळालेला SE-ID प्रगणकाला देणे आवश्यक राहील. त्यानंतर १६ मे ते १४ जून दरम्यान प्रगणक व पर्यवेक्षक घरोघरी भेट देऊन ३३ मुद्द्यांवर माहिती संकलित करतील. यात घराची रचना, कुटुंबाची माहिती, उपलब्ध सुविधा, जीवनशैली तसेच मालमत्ता यांचा समावेश असेल. दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्येची सविस्तर माहिती गोळा केली जाणार आहे.
प्रशासनाने मार्चपासून विविध स्तरांवर प्रशिक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. चार्ज अधिकारी, तांत्रिक कर्मचारी, फील्ड ट्रेनर, प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये लोकसंख्या आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. डहाणू, जव्हार, मोखाडा, पालघर, तलासरी, वसई, विक्रमगड आणि वाडा या तालुक्यांसह डहाणू, जव्हार, पालघर नगरपरिषद आणि मोखाडा, तलासरी, विक्रमगड, वाडा नगरपंचायतींचा समावेश आहे. २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या १८,४०,२६० असून सध्याची अंदाजे लोकसंख्या २४,३०,१८५ इतकी आहे.
घरयादी गट, प्रगणक आणि पर्यवेक्षक यांची संख्या तालुकानिहाय निश्चित करण्यात आली आहे. डहाणू येथे ४९१ घरयादी गट, ५३७ प्रगणक व ८९ पर्यवेक्षक, पालघर तालुक्यात सर्वाधिक ११२२ घरयादी गट, १२२२ प्रगणक व २०७ पर्यवेक्षक कार्यरत राहणार आहेत. इतर तालुके व नगरपालिकांमध्येही त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. एकूण ३४०१ घरयादी गट, ३७१८ प्रगणक आणि ६३६ पर्यवेक्षक यांच्यामार्फत ही मोहीम राबवली जाणार आहे.
जनगणना अधिनियम १९४८ अंतर्गत ३३ प्रश्नांद्वारे माहिती संकलित केली जाणार आहे. यामध्ये घरांची स्थिती, बांधकामासाठी वापरलेले साहित्य, कुटुंब प्रमुखाची माहिती, कुटुंबातील सदस्यांची संख्या, सामाजिक प्रवर्ग, निवास स्थिती, पाणी, वीज, शौचालय, स्वयंपाक इंधन, इंटरनेट, वाहन, मोबाईल तसेच कुटुंबाच्या जीवनमानाशी संबंधित विविध बाबींचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी नागरिकांना स्व-गणनेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करत अचूक माहिती देणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. संपूर्ण माहिती गोपनीय राखली जाणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले. “आमची जनगणना, आमचा विकास” या घोषवाक्याखाली ही मोहीम राबवली जाणार आहे.
चौकटीत :
**तालुका व नगरपालिका निहाय गावे/प्रभाग, २०११ लोकसंख्या व अंदाजे सध्याची लोकसंख्या :
तहसील डहाणू – १७४ गावे; लोकसंख्या ३५१८०८; अंदाजे ३८७०६६
तहसील जव्हार – १०९ गावे; लोकसंख्या १२८१४७; अंदाजे १६१७८६
तहसील मोखाडा – ५६ गावे; लोकसंख्या ७२४३१; अंदाजे ८९६१५
तहसील पालघर – २१६ गावे; लोकसंख्या ५५०१६६; अंदाजे ८०२५९९
तहसील तलासरी – ४१ गावे; लोकसंख्या १३६०९६; अंदाजे १४९६९०
तहसील वसई – ४६ गावे (आऊटग्रोथसह); लोकसंख्या १०८६१५; अंदाजे २०२७६३
तहसील विक्रमगड – ९१ गावे; लोकसंख्या १२९२८५; अंदाजे १४८७२१
तहसील वाडा – १७१ गावे; लोकसंख्या १७८३७०; अंदाजे २००५५०
नगरपरिषद डहाणू – १३ प्रभाग; लोकसंख्या ५०२८७; अंदाजे ५७८३१
नगरपरिषद जव्हार – १० प्रभाग; लोकसंख्या १२०४०; अंदाजे १३८४६
नगरपरिषद पालघर – १५ प्रभाग; लोकसंख्या ६८९३०; अंदाजे १४२३४७
नगरपंचायत मोखाडा – १७ प्रभाग; लोकसंख्या १०२७३; अंदाजे १३३८८
नगरपंचायत तलासरी – १७ प्रभाग; लोकसंख्या १८७२२; अंदाजे ३२०००
नगरपंचायत विक्रमगड – १७ प्रभाग; लोकसंख्या ८३४०; अंदाजे ९५५८
नगरपंचायत वाडा – १७ प्रभाग; लोकसंख्या १६७५०; अंदाजे १८४२५*
*घरयादी गट, प्रगणक व पर्यवेक्षक संख्या :
तहसील डहाणू – ४९१ घरयादी गट; ५३७ प्रगणक; ८९ पर्यवेक्षक
तहसील जव्हार – २४२ घरयादी गट; २६६ प्रगणक; ४५ पर्यवेक्षक
तहसील मोखाडा – १३३ घरयादी गट; १४७ प्रगणक; २५ पर्यवेक्षक
तहसील पालघर – ११२२ घरयादी गट; १२२२ प्रगणक; २०७ पर्यवेक्षक
तहसील तलासरी – २३७ घरयादी गट; २७० प्रगणक; ४६ पर्यवेक्षक
तहसील वसई – २३७ घरयादी गट; २६१ प्रगणक; ४५ पर्यवेक्षक
तहसील विक्रमगड – २०५ घरयादी गट; २०५ प्रगणक; ४० पर्यवेक्षक
तहसील वाडा – ३१४ घरयादी गट; ३४६ प्रगणक; ५९ पर्यवेक्षक
नगरपरिषद डहाणू – ८५ घरयादी गट; ९६ प्रगणक; १६ पर्यवेक्षक
नगरपरिषद जव्हार – २९ घरयादी गट; २७ प्रगणक; ५ पर्यवेक्षक
नगरपरिषद पालघर – १७८ घरयादी गट; १९६ प्रगणक; ३३ पर्यवेक्षक
नगरपंचायत मोखाडा – १७ घरयादी गट; १९ प्रगणक; ४ पर्यवेक्षक
नगरपंचायत तलासरी – ४१ घरयादी गट; ४५ प्रगणक; ८ पर्यवेक्षक
नगरपंचायत विक्रमगड – १९ घरयादी गट; २१ प्रगणक; ४ पर्यवेक्षक
नगरपंचायत वाडा – ५१ घरयादी गट; ६० प्रगणक; १० पर्यवेक्षक
एकूण – ३४०१ घरयादी गट; ३७१८ प्रगणक; ६३६ पर्यवेक्षक*
*जनगणना अधिनियम १९४८ अंतर्गत विचारले जाणारे ३३ प्रश्न (सलग) :
इमारत क्रमांक (नगरपालिका/ स्थानिक संस्था अथवा गणना क्रमांक), गणना घर क्रमांक, गणना घराच्या जमिनीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य, गणना घराच्या भिंतीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य, गणना घराच्या छप्परासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य, गणना घराच्या वापरासंबंधी खात्री करा, गणना घराची स्थिती, कुटुंब क्रमांक, कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या, कुटुंब प्रमुखाचे नाव, कुटुंब प्रमुखाचे लिंग, जर कुटुंब प्रमुख अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/इतर प्रवर्गातील असल्यास, गणना घराच्या मालकी हक्काची स्थिती, केवळ या कुटुंबाच्या ताब्यात असलेल्या निवासयोग्य खोल्यांची संख्या, या कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या, पिण्याचा पाण्याचा मुख्य स्रोत, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असलेला स्रोत, प्रकाशाचा मुख्य स्रोत, शौचालयाची उपलब्धता, शौचालयाचा प्रकार, सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था, स्नानगृहाची उपलब्धता, स्वयंपाकघराची उपलब्धता आणि एलपीजी / पीएनजी जोडणी, स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन, रेडिओ/ट्रान्झिस्टर, दूरचित्रवाणी, इंटरनेट उपलब्धता, लॅपटॉप/संगणक, दूरध्वनी मोबाईल फोन/ स्मार्ट फोन, सायकल/स्कूटर /मोटारसायकल/मोपेड, कार/जीप/व्हॅन, कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य, मोबाइल क्रमांक (फक्त जनगणनेसंबंधी संपर्काकरिता).*