https://youtu.be/AHLTfEuxXAs?si=VCIcpyAHcfsJ_jY-
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी गटनेते,
कैलास म्हात्रेसह अनेक पदाधिकारी
शिवसेना ठाकरे पक्षातून भाजपात
अखेरीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पालघर नगरपरिषदेतील माजी गटनेते कैलास म्हात्रे यांनी अनेक वर्षाची आपल्या मूळ पक्षाची साथ सोडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. पालघर नगरपरिषद निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कैलास म्हात्रे हे बाहेर पडल्याने सेनेसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. त्यांच्या सोबत, माजी नगरसेवक दिनेश बाबर, माजी नगरसेविका चेतना गायकवाड तसेच शहरातील विभाग, उप शहर प्रमुख यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माजी नगरसेविका हिंदवी विरेंद्र पाटील, मनसेचे अमित उल्कदे, शिंदे पक्षाचे माजी नगरसेवक मुनाफ मेमन, युवा जिल्हाध्यक्ष अक्षय संखे, काही शाखा प्रमुख आदींनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला.
डहाणू येथे खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्यासह जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, भाजप शहर प्रमुख अशोक अंबुरे, माजी नगरसेविका लक्ष्मीदेवी हजारीसह मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.खासदार सवरा यांनी यावेळी बोलताना, कैलास म्हात्रे यांच्या माध्यमातून पालघर नगरपरिषद लढवावयाची असल्याचे सांगून एकप्रकारे म्हात्रे हे भाजपाचा पालघर नगरपरिषदेचा चेहरा असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी फोनद्वारा म्हात्रे व सहकार्यांचे स्वागत करून पक्षात त्यांचा सन्मान केला जाईल असे सांगून आश्वस्त केले. जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी भाजपची ताकद जिल्ह्यात वाढली असल्याचे सांगत, जिल्ह्यातील जिल्हा परिषद- पंचायत समित्या व नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक भाजप स्वबळावर लढविणार असल्याचा पुनरुच्चार केला.
नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर म्हात्रे यांना भाजपमध्ये घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या.अर्थात तात्पुर्वीही भाजप नगरपरिषदेसाठी पालघरवासीयांना मान्य चेहर्याच्या शोधात होते. पालघर भाजपमध्ये असा सर्वमान्य चेहरा नसल्याने भाजपने म्हात्रे चा विचार सुरू केला. नगराध्यक्ष पदासाठी अशोक अंबुरे हे इच्छूक होते. मात्र आरक्षणाने त्यांची संधी हुकल्यामुळे अंबुरेही म्हात्रेंसाठी प्रयत्न करू लागले.भाजपच्या वरिष्ठ वर्तुळातुनही म्हात्रेशी संपर्क सुरूच होता.
शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही म्हात्रे यांनी शिंदे पक्षात यावे यासाठी प्रयत्न केले. मात्र मागील अनेक वर्षात डावलले गेल्याची खंत बोलून दाखवत, म्हात्रे यांनी नकार दिला.त्यातच शिंदे पक्षातर्फे उत्तम घरत यांचे नाव पुढे असल्याने, तेथे संधी मिळण्याची संधी धूसर वाटल्याने तेथे जाणे टाळले. शिवसेना ठाकरे पक्षातुनही म्हात्रे यांचा विचार सुरू होता, मात्र उमेदवारी मिळालीतरीही पक्षांतर्गत विरोधाची भीती वाटल्याने म्हात्रेनी मूळ पक्षात राहणे टाळल्याचे सांगितले जाते.
म्हात्रे हे गेली अनेक वर्षे नगरपरिषदेत आहेत.कायद्याची जाण असल्याची त्यांची प्रतिमा आहे.सँधी असतानाही मूळ शिवसेना पक्षाने आपल्याला डावलल्याची त्याची भावना राहिली. नगराध्यक्ष पद हे त्यांचे स्वप्न राहिले आहे. यासाठी, भाजपचे पंख त्यांनी लावून घेतले आहेत. इथे सर्व काही भाजपच पाहणार आहे.
घोडामैदान आता फार दूर नाही....