लोकशाही समाजवादाचे चार तेजस्वी वाटसरू

Date: 2025-12-19
news-banner
लोकशाही-समाजवाद आणि समता या मूल्यांसाठी, समाजवादी चळवळीसाठी आपले सारे आयुष्य झोकून देणाऱ्या चार ध्येयवाद्यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांचे कार्य व त्यांचा वारसा सांगणारे नवयुग पालघर १४ डिसेंबर अंकातील हे संपादकीय ....

लोकशाही समाजवादाचे चार तेजस्वी वाटसरू

 स्वातंत्र्यलढा ही केवळ ब्रिटिश सत्तेविरुद्धची राजकीय चळवळ नव्हती, तर ती माणसाच्या प्रतिष्ठा, सामाजिक समता, न्याय आणि मानवी मूल्यांसाठीची व्यापक चळवळ होती. स्वातंत्र्यानंतर सत्तेची रचना बदलली, पण समाजातील विषमता, अन्याय आणि शोषण संपले नाही. अशा काळात स्वातंत्र्याच्या मूल्यांना जिवंत ठेवत लोकशाही समाजवादाची मशाल पेटती ठेवण्याचे काम ज्या थोडक्या लोकांनी आयुष्यभर केले, त्यात डॉ. जी. जी. पारीख, पन्नालाल सुराणा आणि बाबा आढाव आणि डॉ. विनायक रघुनाथ परुळेकर यांची नावे आवर्जून घ्यावी लागतील. अलीकडेच या चौघांचे निधन झाले आणि त्याबरोबरच स्वातंत्र्य चळवळीशी जोडलेली, संघर्षातून घडलेली एक वैचारिक परंपरा अधिकच विरळ झाली,असे म्हणता येईल.
 डॉ. जी. जी. पारीख हे स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्‌वाचे आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. ‘चले जाव’ आंदोलनात सक्रिय सहभाग घेत त्यांनी स्वातंत्र्यासाठी थेट संघर्ष केला आणि तुरुंगवासही भोगला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी गांधीवादी विचारधारा, सर्वोदय, स्वदेशी आणि स्वावलंबन या मूल्यांना आयुष्याचा केंद्रबिंदू मानले. केवळ भाषणांपुरते गांधीवाद न ठेवता, ग्रामीण भागातील वास्तव बदलण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष काम केले. युसुफ मेहेरअली सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण विकास, खादी-ग्रामोद्योग, सामाजिक समता आणि लोकशाही मूल्यांचे प्रशिक्षण देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले. आणीबाणीच्या काळात लोकशाहीवर आलेल्या संकटाविरोधात उभे राहण्याची त्यांची भूमिका त्यांच्या वैचारिक प्रामाणिकपणाची आणि नैतिक धैर्याची साक्ष देणारी होती. दीर्घायुष्य लाभलेल्या पारीख यांनी स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्रोत्तर समाजकार्य यांतील दुवा म्हणून आपले स्थान निर्माण केले.
 पन्नालाल सुराणा हे समाजवादी विचारांचे अखंड प्रवासी होते. लहानपणी राष्ट्रसेवा दलात घडलेली त्यांची वैचारिक जडणघडण पुढे आयुष्यभराच्या संघर्षाची पायाभरणी ठरली. जयप्रकाश नारायण, विनोबा भावे यांच्या सहवासातून त्यांनी समाजपरिवर्तनाचा मार्ग अधिक स्पष्टपणे स्वीकारला. भूदान चळवळ, भूमिहीनांच्या प्रश्नांवरील संघर्ष, कामगार आंदोलन आणि राजकीय संघटन या सर्व पातळ्यांवर त्यांनी कार्य केले. प्रजा समाजवादी पक्षापासून जनता पक्षापर्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळूनही सत्तेचे आकर्षण न स्वीकारता त्यांनी जनआंदोलनालाच प्राधान्य दिले. भूकंपग्रस्त अनाथ मुलांसाठी उभारलेले ‘आपलं घर’, ग्रामीण विकासाचे प्रयोग, तसेच विपुल लेखन व संपादकीय काम यातून त्यांचा समाजवादी दृष्टिकोन सातत्याने प्रकट झाला. समाजवाद ही केवळ राजकीय संकल्पना नसून तो जीवनाचा व्यवहार आहे, हे त्यांनी कृतीतून दाखवले. 
 बाबा आढाव हे कष्टकरी आणि असंघटित कामगारांचे खरे प्रतिनिधी होते. वैद्यकीय व्यवसाय सोडून हमाल, माथाडी, फेरीवाले, कचरावेचक अशा श्रमिकांच्या हक्कांसाठी उभे राहण्याचा निर्णय हा त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्ें नातं दाखवणारा होता. हमाल पंचायत आणि त्यातून जन्माला आलेला माथाडी कामगार कायदा हा त्यांच्या दीर्घ संघर्षाचा ऐतिहासिक टप्पा ठरला. ‘एक गाव, एक पाणवठा’, ‘कष्टाची भाकरी’ यांसारख्या उपक्रमांतून त्यांनी समतेचा आणि मानवी प्रतिष्ठेचा अर्थ प्रत्यक्ष कृतीतून समाजासमोर ठेवला. वयाच्या नव्वदीतही अन्यायाविरोधात, लोकशाही प्रक्रियांतील त्रुटींविरोधात उभे राहण्याची त्यांची जिद्द प्रेरणादायी होती.
          डॉ. विनायक रघुनाथ परुळेकर यांनी आपल्या निरलस वैद्यकीय सेवेतून जनमानसात आपले अढळ स्थान निर्माण केले. वैद्यकीय सेवा सांभाळतानाच तालुक्यातील समाजवादी चळवळीशी ते अखंडपणे जोडले गेले. तालुक्यातील समाजवादी आंदोलनात ते सक्रिय राहिले. आणीबाणीविरोधात त्यांनी तुरुंगवास देखील भोगला.
 डॉ. जी. जी. पारीख, पन्नालाल सुराणा, बाबा आढाव आणि डॉ.दादा परुळेकर या चौघांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत, वेगवेगळ्या मार्गांनी काम केले, पण त्यांचा समान धागा होता लोकशाही समाजवाद, सामाजिक समता आणि सामान्य माणसाच्या सन्मानाची आस्था. आज त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली असली, तरी त्यांनी उभे केलेले विचार, संस्था, आंदोलन आणि मूल्यांची परंपरा हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल !

Leave Your Comments