कुपोषण निर्मूलन आणि डिजिटल ट्रॅकिंगसाठी पालघरमध्ये उन्नत प्रशिक्षण कार्यशाळा

Date: 2025-12-19
news-banner
कुपोषण निर्मूलन आणि डिजिटल ट्रॅकिंगसाठी पालघरमध्ये उन्नत प्रशिक्षण कार्यशाळा

जिल्हा परिषद पालघर | दि. 05 डिसेंबर 2025

पालघर जिल्ह्यात कुपोषण निर्मूलन, मातृ-शिशु पोषण स्थिती सुधारणा आणि डिजिटल ट्रॅकिंग प्रणाली अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या जननायक बिरसा मुंडा सभागृहात उन्नत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे (भा.प्र.से.) यांनी भेट देत अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधून योजनांच्या अंमलबजावणीसंबंधी मार्गदर्शन केले.

जिल्ह्यातील 12 ग्रामीण आणि 3 नागरी प्रकल्पांतील बालविकास प्रकल्प अधिकारी, मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी असे मोठ्या संख्येने अधिकारी प्रशिक्षणात सहभागी झाले होते. पोषण ट्रॅकिंग व्यवस्थापन, लाभार्थींना सेवांचा वेळेवर लाभ, तसेच Nurture App च्या प्रभावी वापराबाबत विशेष भर देण्यात आला.

मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी पात्र लाभार्थ्यांची छाननी करून स्तनदा व गरोदर मातांचे नोंदणी प्रमाण वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. “बाळाचे पहिले सुवर्णमय 1000 दिवस” या महत्वाच्या उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणी तसेच दुसऱ्या अपत्यावर थांबण्यासाठी जनजागृती उपक्रम बळकट करण्याचे त्यांनी आवाहन केले. नवीन अंगणवाडी बांधकामांची गुणवत्ता तपासण्यासाठी बांधकाम स्थळी प्रत्यक्ष भेट देण्याचेही निर्देश त्यांनी पर्यवेक्षकांना दिले. यावेळी पालवी प्रकल्पाचे विशेष कौतुक करत हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात परिणामकारकरित्या राबवण्याची अपेक्षा व्यक्त केली.

कार्यशाळेत Nurture App अद्ययावत नोंदी, प्रकल्पनिहाय पोषण ट्रॅकरवरील सद्यस्थिती, कुपोषणग्रस्त बालकांसाठी आवश्यक उपाययोजना, VCDC/UCDC तसेच NRC दाखल प्रकरणे यावर सविस्तर चर्चा झाली. डहाणूचे बालविकास प्रकल्प अधिकारी सतीश पोळ यांनी सर्व अधिकाऱ्यांना प्रकल्पनिहाय सखोल प्रशिक्षण दिले.

या प्रसंगी जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्ही. एम. हुंडेकर, पालघरचे बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पवार, पालवी प्रकल्पाचे तुषार मराड यांच्यासह संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यात मातृ-शिशु पोषण सुधारणा आणि डिजिटल ट्रॅकिंग अधिक सक्षम करण्यासाठी ही कार्यशाळा परिणामकारक ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave Your Comments