https://www.instagram.com/p/DTaorQuDC6l/?igsh=aWdrZWQ3eWZ0MW5q
नवयुग पालघर विशेष :
विरार, प्रतिनिधी :
विरार–डहाणू लोकल सेवांचा महत्त्वाचा थांबा असलेल्या विरार रेल्वे स्थानकावरील प्लेटफॉर्म क्रमांक–४ ‘अ’ वर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, रोजची प्रवासी वाहतूक अक्षरशः धोक्यात आली आहे. चौपदरीकरण प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे प्लॅटफॉर्म अरुंद झाला असून, त्यातून अपघात किंवा चेंगराचेंगरीची शक्यता नाकारता येत नाही.
विरार–डहाणू चौपदरीकरणाच्या कामाअंतर्गत ४ डिसेंबर २०२५ पासून सुमारे तीन महिन्यांसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक–३ ‘अ’ ची लांबी वाढविणे तसेच नवीन होम प्लॅटफॉर्म क्रमांक–५ ‘अ’ चे काम सुरू आहे. या कामासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक–४ ‘अ’ वर सुरक्षा पत्रे (शिट्स) बसविण्यात आल्याने प्रवाशांसाठीची जागा अत्यंत निमुळती झाली आहे. याच प्लॅटफॉर्मवर डहाणू लोकल लागल्यावर उतरणारे व चढणारे प्रवासी एकाच वेळी गर्दीत अडकत असून, रोजच धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरीचे प्रकार घडत आहेत.
या गर्दीचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक, महिला व शाळकरी विद्यार्थ्यांना बसत आहे. सकाळच्या वेळेत डहाणू, वैतरणा परिसरातून येणाऱ्या कामगार वर्गाला विरार पुढे वसई, भाईंदर ते थेट अंधेरीपर्यंत प्रवास करायचा असतो. मात्र या अडथळ्यामुळे अनेक प्रवासी प्लॅटफॉर्मवरच अडकून पडत असून, वेळेवर लोकल न मिळाल्याने कामावर उशीर होऊन लेटमार्कची वेळ येत आहे.
ही परिस्थिती लक्षात घेऊन डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने रेल्वे प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्लेटफॉर्म क्रमांक–३ ‘अ’ चे काम पूर्ण होईपर्यंत प्लॅटफॉर्म क्रमांक–४ ‘अ’ वर लागणाऱ्या सर्व डहाणू लोकल गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक–६ वर वळवाव्यात, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना सुरक्षित व सुलभ प्रवास मिळेल तसेच रेल्वेच्या कामातही अडथळा येणार नाही, असे संस्थेचे म्हणणे आहे.
या संदर्भात संस्थेच्या वतीने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच पालघर लोकसभेचे खासदार डॉ. हेमंत सवरा , महाव्यवस्थापक (GM) – चर्चगेट, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM), पश्चिम रेल्वे – मुंबई सेंट्रल, यांना निवेदन देऊन तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रवाशांचा रोजचा प्रवास सध्या अक्षरशः धोक्यात आला असून, एखादा गंभीर अपघात होण्याआधी रेल्वे प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी जोरदार अपेक्षा प्रवासी वर्गातून व्यक्त केली जात आहे.