नवयुग पालघर १४ डिसेंबर :
अवैध मासेमारीचा सुळसुळाट गस्ती नौका बंदच - आमदार भास्कर जाधव
शुक्रवारी (ता. १२) विधानसभेत उध्दव ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी कोकणातील समुद्रात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध मासेमारीकडे लक्ष वेधत, गस्तीसाठी उपलब्ध असलेल्या केंद्र व राज्याच्या आठही स्पीड नौका प्रत्यक्षात बंद असल्याचा गंभीर आरोप केला. या मुद्द्यावरून मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे आणि भास्कर जाधव यांच्यात सभागृहात जोरदार शब्दयुद्ध रंगले.
भास्कर जाधव यांनी सांगितले की, गुजरातसह अन्य परराज्यातील अत्याधुनिक मासेमारी नौका कोकणाच्या समुद्रात मोठ्या प्रमाणावर घुसखोरी करत आहेत. या बोटी ४०० ते ५०० हॉर्सपॉवर क्षमतेच्या असल्याने स्थानिक मच्छिमारांच्या पारंपरिक बोटी त्यांच्या तोडीस तोड ठरत नाहीत.
“या अवैध मासेमारीमुळे स्थानिक मच्छिमारांचे आर्थिक नुकसान तर होतच आहे, पण त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.
मच्छिमारांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारच्या चार आणि राज्य सरकारच्या चार अशा एकूण आठ गस्ती स्पीड बोटी उपलब्ध असतानाही त्या बंद अवस्थेत असल्याचा मुद्दा जाधव यांनी सभागृहात ठामपणे मांडला.
“गस्ती नौका असूनही समुद्रात गस्त नाही, त्यामुळे अवैध मासेमारी करणार्यांचे फावते आहे,” असा आरोप करत त्यांनी सर्व आठही नौका तातडीने सुरू करण्याची मागणी केली.
मत्स्योद्योग खात्याने दिलेल्या लेखी उत्तरावर टीका करताना भास्कर जाधव यांनी, रत्नागिरीत ९ आणि सिंधुदुर्गात १९ परराज्यातील नौकांवर कारवाई केल्याचा उल्लेख असल्याकडे लक्ष वेधले.
“रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातच आहेत. मग परराज्याचा उल्लेख कसा?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी खात्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
यावर उत्तर देताना मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी परराज्यातील बोटी कोकणाच्या समुद्रात येत असल्याचे मान्य केले.“या बोटींकडे अनेकदा हत्यारे असतात आणि हल्ल्यांचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे हा विषय केवळ मासेमारीपुरता मर्यादित नाही, तर तो सुरक्षेशी संबंधित आहे,”असे ते म्हणाले.
राज्याकडे सध्या असलेल्या अनेक गस्ती बोटी लाकडी असल्याचे नमूद करत, “आता १५ स्टीलच्या अत्याधुनिक गस्ती नौका मागवण्यात येत असून ड्रोनच्या सहाय्यानेही समुद्रावर नजर ठेवली जाणार आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.भास्कर जाधव यांनी हा विषय राजकीय नसून हजारो मच्छिमारांच्या उदरनिर्वाहाशी आणि सुरक्षिततेशी निगडित असल्याचे सांगितले.
या चर्चेच्या शेवटी दोघांमधील थेट संभाषणाने सभागृहाचे लक्ष वेधले.
भास्कर जाधव म्हणाले,
“सभागृहात एखादा प्रश्न विचारला म्हणून चिडायचे नसते. चिडायला बाहेर मैदान मोकळे आहे. इथे चर्चा आणि उत्तरं अपेक्षित आहेत. कोकणातील समुद्रात परराज्यातील बोटी मोठ्या प्रमाणावर मासेमारी करत आहेत, हे वास्तव आहे.”
त्यावर उत्तर देताना नितेश राणे म्हणाले,
“चिडणे आणि या प्रश्नाचा काहीही संबंध नाही. २०१४ पूर्वीच सगळं झालं, असं कोणाला वाटू नये म्हणून मी माहिती दिली. परराज्यातील बोटी येतात, त्यांच्या कडे हत्यारेही असतात आणि ते हल्ले करतात. त्यामुळे आता लाकडी बोटींच्या जागी १५ स्टीलच्या गस्ती नौका आणत आहोत. ड्रोनद्वारेही लक्ष ठेवणार आहोत.”
यावर पुन्हा भास्कर जाधव म्हणाले,
“तुमच्या खात्याचे अधिकारी १०० टक्के प्रामाणिकच असतील असे नाही. त्यामुळे खात्याच्या उत्तरात दुरुस्ती करा आणि समुद्रात प्रत्यक्ष गस्त सुरू करा. मच्छिमारांचा प्रश्न गंभीर आहे.”
या शब्दयुद्धामुळे अवैध मासेमारी आणि गस्ती यंत्रणेचा प्रश्न विधानसभेत पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला आहे.