आ. विनोद निकोले यांच्या पाठपुराव्यामुळे आरोग्य मदतनीस व जिल्हा परिषद शिक्षकांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी
पालघर, १३ ऑक्टोबर :
पालघर जिल्ह्यातील आरोग्य मदतनीस आणि जिल्हा परिषद शिक्षक यांचे थकीत मानधन अखेर मार्गी लागले असून, या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही प्रश्नांबाबत आमदार विनोद निकोले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यानंतर तात्काळ मानधन वितरणाचे आदेश देण्यात आले.
आरोग्य मदतनीसांना दिलासा
गत तीन महिन्यांपासून आरोग्य मदतनीसांचे मानधन थकलेले होते. त्यामुळे नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवेवर परिणाम होत होता. या गंभीर प्रश्नाची आमदार विनोद निकोले यांनी गांभीर्याने दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
चर्चेनंतर आरोग्य मदतनीसांना थकित मानधन तात्काळ वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शिक्षकांच्या थकीत मानधनालाही हिरवा कंदील
तसेच इयत्ता ९ वी व १० वीच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकांचे पाच महिन्यांपासून मानधन थकले होते. या विषयावरही आमदार निकोले यांनी चर्चेत ठामपणे पाठपुरावा केला.
मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे यांनी यावर तात्काळ निर्णय देत मानधन वितरणाचे आदेश दिले. यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“शिक्षण आणि आरोग्य सेवा शासनाची जबाबदारी”
या चर्चेदरम्यान आमदार निकोले म्हणाले, “शिक्षण आणि आरोग्य हे दोन्ही घटक समाजाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या क्षेत्रात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे. भविष्यात अशा विलंबाची पुनरावृत्ती होऊ नये,” अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
आत्महत्या प्रकरणी चौकशीचे आश्वासन
अलीकडे आत्महत्या केलेल्या एका आरोग्य मदतनीसाच्या प्रकरणावरही आमदार निकोले यांनी चर्चा केली. त्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर चौकशीअंती कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन दिले.
कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार
आमदार निकोले म्हणाले, “आरोग्य मदतनीस आणि शिक्षकांच्या प्रश्नांवर समाधानकारक तोडगा निघाल्याचा आनंद आहे. भविष्यातही कोणत्याही घटकाच्या अडचणीसाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीस आरोग्य मदतनीस व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.