पालघरमध्ये ‘आदि कर्मयोगी शिष्यवृत्ती (Fellowship)’साठी सामंजस्य करार (MoU)
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ग्रामीण विकासात थेट सहभाग; जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांचे प्रतिपादन
पालघर, दि. १२ डिसेंबर : अनुसूचित जमातींसह समाजातील वंचित घटकांचे सामाजिक-आर्थिक सक्षमीकरण साध्य करण्यासाठी तसेच शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘आदि कर्मयोगी अभियान’ अंतर्गत ‘आदि कर्मयोगी शिष्यवृत्ती (Fellowship)’ सुरू करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थी ग्रामीण विकास प्रक्रियेत सक्रिय आणि महत्त्वाची भूमिका बजावतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले.
पालघर जिल्हा प्रशासन आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालय यांच्यात ‘आदि कर्मयोगी शिष्यवृत्ती (Fellowship)’ राबविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली सामंजस्य करार ( Memorandum of Understanding) करण्यात आला. यावेळी दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. किरण सावे उपस्थित होते.
संपूर्ण शासन यंत्रणांचा समन्वयात्मक दृष्टिकोन (Whole-of-Government Approach) या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून गावपातळीवरील शासकीय कर्मचाऱ्यांची क्षमता-वृद्धी (Capacity Building), विकास योजनांची माहिती आधारित देखरेख (Monitoring) तसेच समुदाय सहभाग (Community Participation) वाढविण्याला नवी दिशा मिळणार आहे. ग्रामीण विकास, अर्थशास्त्र आणि सामाजिक विज्ञान विषयातील उत्साही महाविद्यालयीन विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा भाग बनणार असून, ते गावांतील आजीविका (Livelihood) वृद्धी, आर्थिक स्वावलंबन, शासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि स्थानिक समुदाय सहभाग वाढविण्यासाठी थेट योगदान देतील.
या शिष्यवृत्ती अंतर्गतचे प्रकल्प कार्यालय जव्हार व डहाणू येथे कार्यरत राहणार असून, महिला व बालविकास, कृषी, आरोग्य, वन विभागासह विविध शासकीय यंत्रणांचे सहकार्य या कार्यक्रमाला मिळणार आहे. ग्रामीण प्रशासकीय व्यवस्था (Administrative System) मजबूत करणे, समुदाय सहभाग बळकट करणे, विकास योजनांचे माहितीआधारित नियोजन व देखरेख सक्षम करणे तसेच ग्रामीण व आदिवासी समाजातील आर्थिक सक्षमीकरण (Economic Empowerment) आणि आजीविका वृद्धीला चालना देणे, ही या शिष्यवृत्तीची प्रमुख उद्दिष्टे असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी सांगितले.
‘आदि कर्मयोगी शिष्यवृत्तीमुळे तरुणांना प्रशासनाच्या यंत्रणेशी जोडले जाण्याची आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय अनुभव (Field Experience) मिळविण्याची वेगळी संधी उपलब्ध होणार आहे. आदिवासी बहुल पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा हा उपक्रम नवी ऊर्जा देईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी व्यक्त केला.