नवयुग पालघर
**थरारक पाठलागानंतर अवैध मद्यसाठा जप्त; दोन कारसह १९.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त**
दादरा-नगर हवेली व दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशातून महाराष्ट्रात अवैधरीत्या आणला जाणारा विदेशी मद्यसाठा पकडण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने थरारक पाठलाग करत मोठी कारवाई केली. या कारवाईत दोन चारचाकी वाहनांसह सुमारे १९ लाख ३३ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक पालघर व डहाणू विभागाच्या संयुक्त पथकाने १२ मार्च २०२६ रोजी जव्हार–सेलवासा रोडवर पिंपूर्णा (ता. जव्हार) आणि चालतवड (ता. जव्हार) परिसरात सापळा रचला होता. संशयित वाहनांचा पाठलाग करून करण्यात आलेल्या कारवाईत मारुती स्विफ्ट डिझायर (क्र. MH-01-CJ-4125) आणि होंडा झॅझ (क्र. MH-01-AL-0234) या दोन कारमध्ये दादरा-नगर हवेली व दमण-दीव येथे विक्रीसाठी असलेला, परंतु महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला विदेशी मद्यसाठा आढळून आला.
या कारवाईत एकूण ५० बॉक्समधील ४३२ लिटर्स विदेशी मद्यासह दोन्ही कार असा मिळून १९,३३,१६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अलीम मेहमूद शेख (वय ४१, रा. नुरानी मस्जिदजवळ, महान गाव, ता. बारशी टाकळी, जि. अकोला) आणि अनिल मोतीलाल जयस्वाल (वय ५२, रा. अंबिका नगर, मलकापूर चंदूर, ता. जि. अकोला) या दोन्ही कारचालकांना आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.
या कारवाईत अरुणकुमार चव्हाण, निरीक्षक (भरारी पथक पालघर), सुनिल देशमुख, निरीक्षक (डहाणू विभाग), ए.सी. मानकर, दुय्यम निरीक्षक, तसेच जवान अमोल नलावडे, प्रतिक गांगुर्डे, योगेश हरपाळे, दिपक शेवाळे, शशिकांत पाटील आणि वाहनचालक यांनी सहभाग घेतला.
या गुन्ह्याचा पुढील तपास ए.सी. मानकर, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक पालघर करीत आहेत.
ही कारवाई गणेश बारगजे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.