https://youtu.be/Lhmc-FvNJI8?si=6OE5pDoswA3Jppyp
पालघर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी श्वान-निर्बीजीकरण केंद्रे सुरू
बोईसर व मनोर केंद्रांचे उद्घाटन, सफाळे केंद्र लवकरच कार्यान्वित
पालघर, दि. 11 डिसेंबर :
पालघर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा परिषद पालघरच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत श्वान-निर्बीजीकरण केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. याअंतर्गत बोईसर येथे पहिले केंद्र सुरू झाले असून, मनोर येथे दुसऱ्या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. सफाळे येथे तिसरे केंद्र लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी दिली.
जिल्ह्यात यापूर्वी सातपाटी, अर्नाळा व दांडी या किनारपट्टी भागात सलग दोन वर्षे श्वान-निर्बीजीकरण व रेबीज लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी पालघर जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद ठरली होती. यंदा प्रथमच केंद्र-आधारित प्रणाली सुरू झाल्यामुळे श्वान संकलन, निर्बीजीकरण, लसीकरण व उपचार प्रक्रिया अधिक शिस्तबद्धपणे राबविली जाणार आहे.
बोईसर येथील केंद्र जिल्हा परिषद पालघर व युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस गृहनिर्माण सोसायटी परिसरात सुरू करण्यात आले आहे. येथे प्रशिक्षित तज्ज्ञांकडून श्वानांचे संकलन, शस्त्रक्रिया, रेबीज लसीकरण व आवश्यक उपचार करून त्यांना पुन्हा त्याच परिसरात सोडण्यात येणार आहे. उद्घाटनप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंच व अन्य अधिकारी उपस्थित होते.
त्याच धर्तीवर मनोर ग्रामपंचायत हद्दीत जिल्हा परिषद पालघर व नवसमाज निर्माण बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र सुरू करण्यात आले. उद्घाटनावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर, ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
भटक्या कुत्र्यांची अनियंत्रित वाढ, नागरिकांना होणारा त्रास व रेबीजचा धोका लक्षात घेता ही केंद्रे अत्यंत आवश्यक असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी सांगितले. केंद्र-आधारित श्वान-निर्बीजीकरण मोहीम प्रभावीपणे राबविल्यास रेबीजचा धोका कमी होऊन नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बोईसर, मनोर व सफाळे येथील केंद्रे पूर्णतः कार्यान्वित झाल्यानंतर पालघर जिल्ह्यात भटके श्वान नियंत्रण, रेबीज प्रतिबंध तसेच नागरी व पर्यटन क्षेत्रातील सुरक्षिततेस मोठा फायदा होणार आहे.