https://youtu.be/X5-LfB29l0k?si=tHc2XtVi7ExB-4D6
नवयुग पालघर विशेष Navyug Palghar Special
पालघर जिल्ह्यात दिवाळीची सुरुवात "आठवडा" पासून
काराष्टमीला अंगण सजवून दिवाळीच्या आनंदाची सुरुवात — निसर्ग, शेती आणि परंपरेचं प्रतीक असलेला "आठवडा" साजरा
सगळीकडे दिवाळीची लगबग सुरु झालेली आहे. घरातले लहान थोर फटाके, कपड्यांच्या शॉपिंगमध्ये तर महिला वर्ग साफसफाई, दिवाळी फराळ बनवण्यात व्यस्त असणार. या वर्षी १७ ऑक्टोबर पासून वसुबारस या दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात होणार आहे. सगळीकडे रांगोळ्या, फटाके, आकाशकंदील आणि दिव्यांची रोषणाई दिसणार. संपूर्ण भारतात दिवाळी जरी वसुबारस या दिवसापासून सुरु होत असली तरी पालघर जिल्ह्यात दिवाळीची सुरुवात हि काराष्टमी (आज) पासून होते. याला कालाष्टमी असेही म्हणतात.
या दिवशी प्रत्येक घरासमोर आठवडा काढला जातो आणि रांगोळ्या व दिवे लावण्यास सुरुवात होते. हाच दिवाळीचा पहिला दिवस. कोजागिरी पौर्णिमेच्या दरम्यान पावसाळा संपून शेतात भात कापणीला सुरुवात झालेली असते. झोडणी करून भात दळण्यासाठी गिरणीत पोहचलेले असते. मग गिरणीत जाऊन भाताचा तूस आणायचा. काराष्टमीच्या २-३ दिवस अगोदर तो जाळून त्याची पांढरी राख जमा करायची. आजच्या म्हणजेच काराष्टमीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस अंगण झाडून स्वच्छ करायचे आणि आठवडा म्हणजेच रांगोळी या पांढऱ्या राखेने काढायची.
हि रांगोळी काही ठिपक्यांची किंवा विविध कार्यक्रमावेळी काढली जाणारी रांगोळी नव्हे. तर निसर्गाशी, शेतीशी आणि घराशी संबंधित गोष्टींची चित्रे यामार्फत काढली जातात. यात चंद्र, सूर्य, तारे, तुळशी वृंदावन, सूप, कणगा, शिडी, चक्र, स्वस्तिक, फुले, दिवाळीचे फटाके, शेतीची अवजारे, जाते अशी चित्रे काढून शुभ दीपावली, आठवडा असे नमूद केले जाते.
पालघर मधील प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या अंगणात हा आठवडा काढला जातो. पालघर मधील आदिवासी, आगरी, वाडवळ, कुणबी, भंडारी अशा सगळ्या समाजात हा दिवाळीचा पहिला दिवस आठवडा काढून साजरा केला जातो. आगरी समाजात याला आठवडा, वाडवळ समाजात आठोंडा किंवा आठविडे तर आदिवासी समाजात याला आठिंडे असे संबोधले जाते. नावे जरी वेगळी असली तरी हा दिवस साजरा करायची पद्धत एकच आहे.
संपूर्ण घराभोवती राखेने रांगोळीचा पट्टा काढला जातो आणि नंतर अंगणात चित्रे काढली जातात. हि रांगोळी शेतकऱ्याचे निसर्गाशी असलेले नाते आणि कुटुंबाची सुखसमृद्धी दर्शविते.
पालघर शहरातील टेंभोडे गावात आगरी समाज मोठ्या प्रमाणात आहे. बहुसंख्य लोकांचा उदरनिर्वाह शेतीवरच असे. पूर्वी सगळ्यांच्या शेतात दिवाळी अगोदर भात कापणी होऊन भात दळायला गिरणीत पोहोचत असे. दिवाळीपूर्वी तांदूळ / भात खरेदी करायला काही ठराविक मुस्लिम व्यापारी येत असत. त्यांना भात विकून त्या पैश्यातून संपूर्ण कुटुंबासाठी दिवाळीची खरेदी होत असे. जर हि खरेदी विक्री काही कारणास्तव झाली नाही तर पालघर मधील धनजी नथू आणि कंपनी या दुकानातून उधारीवर सगळी कपडे खरेदी होत असे. जेव्हा भात विक्री होईल तेव्हा उधारी चुकती करण्यात येत असे.
दिवाळी अगोदर नवान्न पौर्णिमेला म्हणजेच आजच्या कोजागिरी पौर्णिमेच्या काही दिवस अगोदर शिरगावहून काही मुस्लिम समाजातील स्त्रिया मोठे जाते घेऊन भात दळून द्यायला येत असत. त्यांच्याकडून नव्याचे तांदूळ दळून घेतले जात असत. पौर्णिमेच्या दिवशी नव्याच्या तांदळाची खीर बनवून देवाला नैवेद्य दाखवला जात असे. त्यानंतरच घरात नव्याच्या भाकरी आणि भात बनवण्यास सुरुवात होई.
दिवाळीत रांगोळी काढण्यासाठी खास ओटलीची सोय केली जात असे. पायरीच्या खाली मातीची ओटली बनवून त्यावर शेणाने सारवून आणि मग गेरू लावून काराष्टमीपासून ठिपक्यांची रांगोळी काढली जात असे. आता बर्याचश्या घरात शेणाच्या ओटलीची जागा सिमेंट किंवा ग्रॅनाइटच्या पर्मनंट ओटलीने घेतली आहे.
पूर्वीच्या काळी दिवाळी कमी साधनसंपत्तीत आणि मोठ्या कुटुंबासोबत साजरी केली जात असे. आता विभक्त कुटुंब पद्धती जास्त वाढत असल्याकारणाने दिवाळी कधी येते आणि जाते हे कळत देखील नाही. तरीही पालघर जिल्ह्यात बहुसंख्य कुटुंबाच्या दिवाळीची सुरवात आजही आठवडा साजरा करूनच होते. आणि तशी आज (सोमवार १३ ऑक्टोबर) रोजी झालीही आहे. घरासमोरची अंगणं रांगोळीने सजली आहेत...
✍️ स्मिता पाटील आरेकर