जव्हारमध्ये १२३४.५५१ हेक्टर सामूहिक वनहक्क पट्ट्यांचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या हस्ते वाटप

Date: 2025-12-13
news-banner
जव्हारमध्ये १२३४.५५१ हेक्टर सामूहिक वनहक्क पट्ट्यांचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या हस्ते वाटप

पालघर, दि. १२ डिसेंबर :
जव्हार तालुक्यातील आदिवासी भागांच्या हक्कसंरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारा सामूहिक वनहक्क पट्टे वाटपाचा कार्यक्रम भोपतगड येथे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमात एकूण १२३४.५५१ हेक्टर (हे.आर.) क्षेत्रफळाचे सामूहिक वनहक्क पट्टे विविध गावांना प्रदान करण्यात आले.

या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी चिंचवाडी व भोपतगड परिसरात विविध विकासात्मक उपक्रमांची पाहणी केली. चिंचवाडी येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला भेट देत त्यांनी आरोग्य सेवांच्या उपक्रमांचे कौतुक केले.

भोपतगड येथे आयोजित कार्यक्रमात पुढीलप्रमाणे सामूहिक वनहक्क पट्ट्यांचे वितरण करण्यात आले —

सोनगीरपाडा–घाटाळपाडा : ६१०.३७ हेक्टर आर

अनंतनगर–कोगदा : १९२.१८१ हेक्टर आर

हाडे–देवीचापाडा : १३२ हेक्टर आर

झाप–चिंचवाडी : ३०० हेक्टर आर


हाडे (देवीचापाडा), ऐन (सोनगीरपाडा), चिंचवाडी तसेच कोगदा (अनंतनगर) येथील सामूहिक वनहक्क समित्यांचे अध्यक्ष व सचिव यांना जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या हस्ते हे वनहक्क पट्टे प्रदान करण्यात आले. स्थानिक आदिवासी समुदायांच्या हक्कसंरक्षणासाठी हा टप्पा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी ऐतिहासिक भोपतगड किल्ल्याची पाहणी केली. यानंतर आयोजित ग्रामसभेत त्यांनी ग्रामस्थांना विकास, हक्कसंरक्षण व वनव्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. ग्रामस्थांनी उपस्थित राहून शंका-समाधान सत्रात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या कार्यक्रमास वयम संस्थेचे अध्यक्ष मिलिंद थत्ते, प्रभारी तहसीलदार सुरेश कामडी, उपवनसंरक्षक सैपुन शेख, तसेच महसूल विभाग, वनविभाग व प्रकल्प कार्यालयातील अधिकारी अभयकुमार टकले, रास्ते, टीके आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave Your Comments