पालघर जिल्हा परिषद आरक्षण सोडतीत अनेकांना धक्के; प्रकाश निकम, कुंदन संखे यांचे समीकरण बिघडले

Date: 2025-10-14
news-banner
https://youtu.be/jKgbsWXuW6k?si=Al-qkfmx9BSpVva1

पालघर जिल्हा परिषद आरक्षण सोडतीत अनेकांना धक्के; प्रकाश निकम, कुंदन संखे यांचे समीकरण बिघडले

पालघर, १३ ऑक्टोबर :
            लाडकी बहीण म्हणा, नाही तर आणखी काही... आमचे राजकीय नेते , म्हणजे पुरुष मंडळी.. राजकीय क्षेत्रातही महिलांना सहजासहजी स्वीकारण्यास तयार नाहीत, याचे प्रत्यंतर आज, जिल्हा परिषद/ पंचायत समिती आरक्षण सोडती दरम्यान आले... महिला आरक्षणाच्या चिठ्ठ्याची वेळ येताच...सारेच स्तब्ध... साऱ्यांचेच ठोके वाढलेले....
           पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी विविध प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षणाच्या चिठ्या काढताना उपस्थित राजकीय कार्यकर्त्यांच्या छातीत धडधड वाढली. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या सोडतीत अनेक नेत्यांचे राजकीय गणित बिघडले असून काहींना मोठे धक्के बसले. 

          माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या मोखाडा तालुक्यातील आसे, पोशेरी आणि खोडाळा या तिन्ही जागा अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव निघाल्या आहेत. त्यामुळे निकम यांना पुन्हा एकदा नव्या तालुक्यात जागेचा शोध घ्यावा लागणार आहे. २०१९ सालीही अशाच परिस्थितीत त्यांनी आपल्या भागात संधी न मिळाल्याने पालघर तालुक्यातील दांडी या गटातून निवडणूक लढवली होती.

दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनाही या सोडतीत धक्का बसला. ते पालघर तालुक्यातील दांडी या गटातून उमेदवारीची तयारी करत होते, मात्र ती जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) म्हणून आरक्षित निघाली. आता त्यांनाही अन्य जागेचा शोध घ्यावा लागेल.

तसेच सरावली गटावर अनेक इच्छुकांनी लक्ष केंद्रीत केले होते; मात्र ही जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित निघाल्याने अनेकांचे चेहरे पडले. सर्वसाधारण प्रवर्गातील चार जागांपैकी एक जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली होती, आणि त्यात सरावलीची चिठ्ठी निघाल्याने इच्छुकांची निराशा झाली. 
     तर उर्वरितांनी आपली जागा आरक्षित न झाल्याने केवळ सुटकेचा निःश्वास टाकला नाही, तर आपल्या समोरील बाके वाजवून व एकमेकांना आलिंगन देत , , , एकमेकांचे अभिनंदन करून आनंद व्यक्त केल्याचे पहायला मिळाले...
          लाडक्या बहिणींनी निवडून दिले, म्हणून यातीलच अनेक जण आपल्या ह्या बहिणींचे किती कौतूक करत होते...

            या आरक्षणात यावेळी केळवा, माहीम, उंबरपाडा नंदाडे हे गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) साठी राखीव झाले.


सोडतीचा तपशील

जिल्हाधिकारी इंदू राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाची सोडत पार पडली. उपजिल्हाधिकारी ( साप्र) रणजित देसाई आणि त्यांचे सहकारी अधिकारी/कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

पालघर जिल्हा परिषदेत एकूण ५७ सदस्य निवडून द्यायचे आहेत. सोडतीचा क्रम पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला:

1. अनुसूचित जाती – अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या म्हणून पालघर तालुक्यातील पास्थळ गट अनुसूचित जातीसाठी राखीव ठरला. यापूर्वी, ही जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित होती; म्हणून, यावेळी ती अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव करण्यात आली.


2. अनुसूचित जमाती प्रवर्ग – एकूण ३७ जागा लोकसंख्येच्या प्रमाणावर राखीव करण्यात आल्या. त्यापैकी १९ जागा अनुसूचित जमाती (महिला) तर उर्वरित १८ जागा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राहिल्या.


3. नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – एकूण १५ जागा आरक्षित करण्यात आल्या. त्यापैकी ८ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी तर ७ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी निश्चित झाल्या.


4. सर्वसाधारण प्रवर्ग – उर्वरित ४ जागांपैकी एक जागा महिलांसाठी आरक्षित ठरली, तर ३ जागा खुल्या म्हणजेच कोणत्याही उमेदवारासाठी खुल्या राहिल्या.

           जिल्हा परिषद आरक्षण खालीलप्रमाणे :

अनुसूचित जाती (०१) : ३९ पास्थळ (अनुसूचित जाती लोकसंख्या १९१४)

अनुसूचित जमाती (१८) : २२ कुर्झे, २५ विनवळ, १२ चारोटी, १७ हालोली, १८ दाभोण, १४ कैनाड, १० बोर्डी, ४८ धुकटन, १५ सरावली, २० मलवाडा, १३ आशागड, ३३ गालतरे,४ वसा, ३१ वरसाळे,७ आंबेसरी,५ वडवली,१ उपलाट, ५४ भाताणे 

अनुसूचित जमाती महिला (१९) : २८ आसे, ३२ गांधरे, १० आंबोली,३० खोडाळा, ३ डोंगारी, २७ झाप, १९ तलवाडा, ९ चळणी, ११ भिसेनगर, २४ वावर, ४४ शिगाव, २९ पोशेरा, २३आलोंडा, २६ जव्हार ग्रामीण, ३४ खानिवली, २१ दादडे, २ सुत्रकार, ४५ बऱ्हाणपूर, ८ मोरगाव

नागरिकांचा मागास प्रवर्ग (७) : ३७ तारापूर, ५५ चंद्रपाडा,४६ मनोर, ४१ बोईसर वंजारवाडा, ४९ सातपाटी, ३६ कुडूस, १७ चिंचणी

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (८) : ५३ उंबरपाडा नंदाडे ,५१ केळवा, ५६ अर्नाळा किल्ला, ५० माहीम, ४० बोईसर, ३८ दांडी, ४३ खैरापाडा, ५२ एडवण

सर्वसाधारण (३) : ३५ खुपरी, ५७ कळंब, १६ धाकटी डहाणू 

सर्वसाधारण महिला (०१) : ४२ सरावली

Leave Your Comments