**युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; ‘प्रधानमंत्री प्रशिक्षणार्थी योजनेतून’ करिअरला नवी दिशा**

Date: 2026-04-10
news-banner
नवयुग पालघर 

**युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; ‘प्रधानमंत्री प्रशिक्षणार्थी योजनेतून’ करिअरला नवी दिशा**

               देशातील युवक-युवतींसाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री प्रशिक्षणार्थी (PMIS)  योजनेचा तिसरा टप्पा (Round 3) सुरू होत असून पालघर जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
             या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये ६ ते ९ महिन्यांची इंटर्नशिप दिली जाणार आहे. प्रशिक्षण काळात दरमहा सुमारे ₹९,००० विद्यावेतन देण्यात येणार असून, पालघर जिल्ह्यातही रिलायन्स इंडस्ट्रीज , एचडीएफसी बँक, गेल(Gail) इंडिया लिमिटेड  यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध आहेत.
           या उपक्रमामुळे युवकांना उद्योग क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून, नवीन कौशल्ये आत्मसात करण्यासह व्यावसायिक नेटवर्क तयार करण्याची संधी मिळेल. केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेत देशातील सर्वोच्च २ हजार कंपन्यांचा सहभाग आहे. शिक्षण आणि उद्योग यामधील दरी कमी करून युवकांना रोजगारक्षम बनविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
            योजनेत सहभागी उमेदवारांना विद्यावेतन थेट बँक खात्यात (DBT) जमा होणार आहे. तसेच जीवन व अपघात विमा संरक्षण, अतिरिक्त ₹६,००० पर्यंत अनुदान आणि प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत सुरक्षा कवच देण्यात येणार आहे.
             पात्रता निकष : 
             १८ ते २५ वयोगटातील भारतीय नागरिक, ज्यांनी दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, बीई, बीटेक आदी शिक्षण पूर्ण केले आहे आणि सध्या पूर्णवेळ नोकरीत नाहीत, असे युवक-युवती या योजनेसाठी पात्र आहेत.
            इच्छुकांनी, https://pminternship.mca.gov.in⁠ या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पालघर येथे संपर्क साधावा.
              पालघर जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या करिअरला नवी दिशा द्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

Leave Your Comments