https://youtu.be/ZcSulmznmVA?si=rsyB19-WL7Qo4fv8
हॉटेल व्यवसायासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात सर्जनशीलतेला मोठा वाव – युसुफ पटेल
सफाळे, दि. १३ डिसेंबर :
विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, सर्जनशीलता आणि व्यावसायिक कौशल्यांची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने सफाळे येथील राजगुरू ह. म. पंडित विद्यालयात आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत खाद्य जत्रा महोत्सव २०२५ उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या अनोख्या उपक्रमाने चव, संस्कृती आणि आनंद यांचा सुंदर संगम घडवून आणला.
या खाद्य जत्रेचे उद्घाटन विद्यालयाचे माजी विद्यार्थी व मुंबईतील सुप्रसिद्ध सुबा ग्रूप ऑफ हॉटेल्सचे बँक्वेट डायरेक्टर युसुफ पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना युसुफ पटेल यांनी, परिसरातील निसर्गसंपन्नता आणि भविष्यात वाढणाऱ्या पर्यटन व्यवसायाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल मॅनेजमेंटसारख्या सर्जनशीलतेला वाव असलेल्या क्षेत्रांकडे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी वळावे, असे प्रतिपादन केले.
तारांकित हॉटेल उद्योगातील आपल्या ३२ वर्षांच्या अनुभवांवर आधारित विविध प्रसंगांचे कथन करत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. “हॉटेल व्यवसाय हे केवळ नोकरीपुरते मर्यादित नसून, कल्पकता, नेतृत्वगुण आणि ग्राहकसेवा यांचा उत्तम संगम असलेले आव्हानात्मक क्षेत्र आहे,” असे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी उभारलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सना भेट देत विविध पदार्थांचा आस्वाद घेतला व विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. विद्यार्थ्यांमधील पाककलेतील कौशल्य, पदार्थ सादरीकरणातील कल्पकता आणि विक्रीकौशल्य यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
या महोत्सवात विद्यार्थ्यांतर्फे स्थानिक, पारंपरिक तसेच पाश्चात्य खाद्यपदार्थांचे तब्बल १२० स्टॉल्स उभारण्यात आले होते. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध स्टॉल्सना भेटी देत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.
खाद्य जत्रा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये पाककलेविषयी आवड निर्माण होईल आणि भविष्यातील करिअरच्या संधींबाबत सकारात्मक दृष्टीकोन विकसित होईल, असा विश्वास मुख्याध्यापिका मधुमती कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी डॉ. पांडुरंग वामन अमृते शिक्षण संस्थेचे पदाधिकारी रवी शिवदे, उपमुख्याध्यापिका सुजाता घरत, मुख्याध्यापिका मधुमती कुलकर्णी, शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.