नवयुग पालघर ११ जानेवारी :
आयुष्य ही इतरांशी स्पर्धा नाही,ती स्वत:शी असलेली स्पर्धा आहे-उद्योजक नयन पटेल
https://youtu.be/c5wTph1MO4Y?si=2iiqHq6vcwJpbRlp
विद्यार्थ्यांनो स्वप्ने पहा, मेहनत करा, स्वत:वर विश्वास ठेवा. अडचणी येतील, पण त्यातून शिका. दबावातून नाही, तर मोकळेपणातून विकास होतो. आयुष्य ही इतरांशी स्पर्धा नाही; ती स्वत:शी असलेली स्पर्धा आहे. विराज इंटरनॅशनल स्कूलमधून तुम्हाला शिक्षणाचा उत्तम अनुभव आणि आयुष्यभर जपता येतील अशा आठवणी मिळोत अशा शुभेच्छा पटेल एक्स्ट्रुजन ग्रुपचे कार्यकारी संचालक, नयन पटेल यांनी विद्यार्थ्यांना दिल्या. विराज इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
विराज इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्ष रेणू कोचर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्यासह विराज प्रोफाइल्स लि.चे अध्यक्ष नीरज राजा कोचर, विराज इंटरनॅशनल स्कूलचे कार्यकारी संचालक जयंत लाल,प्राचार्य सुखजीत सिंग उपस्थित होते.
आपल्या भाषणाची सुरुवात करताना, सर्वप्रथम, मला मुंबईतून इथे खेचून आणल्याबद्दल त्यांनी रेणू कोचर यांचे मन:पूर्वक आभार मानले. या शाळेबद्दल, या उपक्रमाबद्दल त्या फार पूर्वीपासून माझ्याशी “ नवीन वर्ग सुरू केला, आणखी एक विभाग सुरू केला...” असं भरभरुन बोलत असतं असे सांगून हे सगळं ऐकताना माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला — खरंच, इथे नेमकं काय घडत असेल? म्हणून जेव्हा त्यांनी मला इथे येण्याचं निमंत्रण दिलं, तेव्हा मी शाळेबद्दल माहिती घेतली, संकेतस्थळ पाहिलं आणि मी खूप प्रभावित झालो. आज प्रत्यक्ष इथे आल्यावर आणि संपूर्ण परिसर पाहिल्यावर माझं कौतुक आणि कोचर
यांच्या दूरदृष्टीबद्दलचा आदर आणखी वाढला असल्याचे ते म्हणाले. बोईसरसारख्या ठिकाणी उभ्या केलेल्या या पायाभूत सुविधा फारच कमी ठिकाणी पाहायला मिळतात. मुंबईसारख्या शहरातसुद्धा अशा सुविधा सहज दिसत नाहीत. आज आपल्या मतदारसंघात अशी शाळा आहे, याचा अभिमान खासदार सवरा यांनाही वाटत असेल असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना उद्देशून तुम्ही भाग्यवान असल्याचे लक्षात आणून देत, जलतरण तलाव, सभागृह, सुंदर वर्गखोल्या — एकंदरीत सांगायचं तर, शाळेकडे असावं असं सर्वोत्तम पायाभूत सुविधा इथे आहेत. मी आणि नीरज कोचर दोघंही उद्योग क्षेत्रातून आलो आहोत. आम्ही शिक्षणतज्ज्ञ नाही, आम्ही उत्पादक आहोत. पण तरीसुद्धा मी या शाळेकडे एका उत्पादन केंद्रासारखंच पाहतो. इथे काय तयार होतं? इथे प्रतिभा घडवली जाते असे ते म्हणाले. कोणताही कारखाना चालवायचा असेल, तर यंत्रसामग्री, कच्चा माल लागतो, पण त्याहून महत्त्वाचं असतं — दर्जेदार मनुष्यबळ. तेच मनुष्यबळ, तेच टॅलेंट, इथे घडवलं जातं असल्याचा अभिमानास्पद उलॢेख त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, फक्त शिक्षण पुरेसं नसतं. समग्र विकास खूप गरजेचा असतो, आणि तो मला इथे दिसतो. इथे केवळ पुस्तके नाहीत, केवळ वर्गखोल्या नाहीत — इथे माणूस घडवला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यांनी ते चार गोष्टी महत्त्वाच्या मानतात असे नमूद करत , शिक्षणाला ते महत्व देतात.. आमच्या काळात जो शिकला, त्याला काम मिळालं. ज्यांच्याकडे शिक्षण आणि अनुभव होता, त्यांना नोकरी मिळायची. पण आजचा काळ वेगळा आहे. आजचा नियोक्ता फक्त पदवी पाहत नाही; तो प्रतिभा, आत्मविश्वास आणि अनुभव पाहतो.पण या सगळ्यांपेक्षाही महत्त्वाचं आहे संवाद कौशल्य. आज विद्यार्थी हुशार असतात, पण संवाद साधण्यात कमी पडतात. बॉस काय सांगतोय ते समजणं आणि आपण काय सांगतोय ते बॉसपर्यंत स्पष्ट पोहोचवणं, हे खूप महत्त्वाचं असल्याचं त्यांनी ठासून सांगितले.
वडिलांनी मला दोन सल्ले दिले होते, त्यातील पहिला कठोर परिश्रमाला पर्याय नाही तर दुसरा उद्दिष्ट गाठता येत नाही म्हणून ते कमी करू नका; उद्दिष्ट उंच ठेवा असा सलॢा देत त्यांनी निरज कोचर यांनी असंच उंच ध्येय समोर ठेऊन विराजचे साम्राज्य उभे केल्याचे निदर्शनास आणले. त्याचबरोबरीने रेणू कोचर यांचं उदाहरणही त्यांनी समोर ठेवले.. लग्नाच्या आधीच त्यांनी स्वप्न पाहिलं होतं. स्वत:ची शाळा सुरू करायची. आज ते स्वप्न प्रत्यक्षात उभं असल्याचे ते म्हणाले. गेल्या आठवड्यात मी डॉ. रघुनाथ माशेलकर यांना ऐकलं. कधीकाळी चप्पलही नव्हती, १५ किलोमीटर चालत शाळेत जायचे, आणि आज ते देशाचे नामवंत शास्रज्ञ आहेत.
म्हणून विद्यार्थ्यांनो, स्वप्न पाहा, मेहनत करा, स्वत:वर विश्वास ठेवा. अडचणी येतील, पण त्यातून शिका. दबावातून नाही, तर मोकळेपणातून विकास होतो. आयुष्य ही इतरांशी स्पर्धा नाही; ती स्वत:शी असलेली स्पर्धा आहे. विराज इंटरनॅशनल स्कूलमधून तुम्हाला शिक्षणाचा उत्तम अनुभव आणि आयुष्यभर जपता येतील अशा आठवणी मिळोत अशा शुभेच्छा त्यांनी भाषणाच्या अखेरीस दिल्या.
खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी बोलताना विराज शाळेचे कौतुक केले.माझ्या मतदारसंघात अशा प्रकारची शाळा आहे याचा मला अभिमान असल्याचे सांगून इथे फक्त शाळेतील वर्गात नाही परंतु बाहेरही विद्यार्थी घडवला जातो.त्याचबरोबर केवळ विद्यार्थी नाही तर एक चांगला माणूस व उद्याची पिढी घडविण्याचे काम या शाळेतून होत असल्याचे ते म्हणाले.हे देश व राज् याच्या बरोबरीने पालघर जिल्हा तंत्रज्ञानाच्या बाबतीत वेगाने विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेतर्फे काही समस्या मांडण्यात आल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.
तत्पूर्वी प्रास्तविकात मुख्याध्यापक सुखजीत सिंग यांनी शाळेच्या वाटचालीचा मागोवा घेत मागील वर्षातील शैक्षणिक सह क्रीडा व अन्य क्षेत्रातील यशाची माहिती दिली.कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणे - खासदार डॉ.हेमंत सावरा, प्रमुख अतिथी - नयन पटेल, कार्यकारी संचालक, पटेल एक्स्ट्रुजन ग्रुप, अन्य अतिथी विराज इंटरनॅशनल स्कूलचे कार्यकारी संचालक जयंत लाल, - नीरज राजा कोचर, अध्यक्ष, रेणू कोचर, चेअरपर्सन आदिंचा सत्कार करण्यात आला.
वार्षिक स्नेहसंमेलनात उपस्थित अन्य प्रमुख पाहुणे जयंत लाल यांनी आजच्या काळातील मुलांच्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवर अत्यंत संवेदनशील आणि विचारप्रवर्तक भाषण केले. बदलत्या जीवनशैलीमुळे पूर्वी केवळ परदेशांपुरती मर्यादित वाटणारी मानसिक तणावाची समस्या आता आपल्या देशात, अगदी लहान शहरांमध्येही हळूहळू डोके वर काढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आपल्या भाषणात ते म्हणाले की, आपण वर्तमानपत्रांतून व दूरदर्शनवरील बातम्यांमधून परदेशातील मुलांना मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जाताना पाहतो. कधी काळी ही समस्या आपल्याकडे येईल असा कोणीही विचार केलेला नव्हता; मात्र आज ती आपल्या समाजातही हळूहळू प्रवेश करत आहे. लहान शहरांतील मुलांनाही याचा फटका बसत असल्याचे वास्तव नाकारता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, मुलांचे भवितव्य घडवणे ही पालक, शाळा आणि समाज यांची एकत्रित जबाबदारी आहे. “आपण शिक्षणावर खूप भर देतो, पण त्याच वेळी मुलांबरोबर घालवण्यासाठी आवश्यक तो वेळ पालक देत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. आज मुलं सोशल मीडियामध्ये गुंतलेली आहेत, पालकही मोबाईलमध्ये व्यस्त आहेत आणि या सगळ्यात संवाद हरवत चालला आहे,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
मुलांशी केवळ बोलू नका, तर त्यांच्याशी संवाद साधा, त्यांचे म्हणणे ऐका, त्यांच्या भावना समजून घ्या, असे आवाहन करत त्यांनी सांगितले की, समाज म्हणून आपण जर मुलांचे ऐकले, त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला, तर अनेक मानसिक समस्या उद्भवण्यापूर्वीच टाळता येतील. पालक, मुले आणि शाळा हे एकसंघ म्हणून काम करतील, तेव्हाच मुलांना सकारात्मक, यशस्वी आणि आनंदी आयुष्य जगण्याची दिशा मिळेल, असेही त्यांनी अधोरेखित केले.
या संदर्भात महत्त्वाचे विचारवाक्य उद्धृत करत ते म्हणाले, “घर आणि शाळा या दोन्ही ठिकाणी जेव्हा सहानुभूती, संवाद आणि समजूतदारपणा असतो, तेव्हा मुले सुरक्षिततेची भावना अनुभवतात. त्या सुरक्षिततेतूनच ती वाढतात, नवनवीन गोष्टींचा शोध घेतात आणि उंच भरारी घेतात. हेच आपल्या मुलांना व्हायचे आहे.”याचे भान देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
तदनंतर विद्यार्थ्यांनी आपल्या इळर्झ्REएएघ्ध्र्ए या कार्यक्रमात अनेक नृत्य,संगित,नाट्य आधारित सास्कृतिक कार्यक्रम सादर करत, सर्वांची वाहवा मिळवली. मंथन या शिर्षकाखाली आंतरशालेय समाजशास्र , घणित व विज्ञान प्रदर्शनही यावेळी भरविण्यात आले होते.
विराज स्कूलचे कार्यक्रम संचालक सचिन देसाई याच्यासह मान्या सिंघल,आयांश,देव अग्रवाल व न्यासा सोनपरोटे या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
कार्यक्रमादरम्यान, दहावी - इशिता सिंग, रितेश कीर्ती पारेख, श्रीमती अतुल तायडे व बारावी - ऋषिका राहुल चौधरी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांसह उत्तम कामगिरी करणार्या मोनिका पाटील, राहुल पगधरे, रीमा कंसारा या शिक्षकांचा गौरव करण्यात आला.