** बोईसरमध्ये लेव्हल-३ ऑफसाईट कवायत ; औद्योगिक आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची तयारी तपासली**
औद्योगिक आपत्कालीन परिस्थितीला तात्काळ व प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासनाने गुजरात गॅस लिमिटेड (GGL) यांच्या समन्वयाने तारापूर औद्योगिक वसाहत ( MIDC), बोईसर येथे लेव्हल-३ ऑफसाईट सराव कवायत यशस्वीरित्या पार पाडली. १३ मार्च २०२६ रोजी कॅमलिन सर्कल परिसरात झालेल्या या सरावाद्वारे भूमिगत उच्चदाब गॅस पाइपलाइनला झालेल्या नुकसानीमुळे लागलेल्या भीषण आगीच्या काल्पनिक परिस्थितीचे अनुकरण करण्यात आले.
उत्खननाच्या कामादरम्यान गुजरात गॅस लिमिटेडच्या भूमिगत स्टील गॅस पाइपलाइनला धक्का बसून मोठी आग लागल्याची परिस्थिती गृहित धरून ही कवायत घेण्यात आली. आपत्कालीन सायरन वाजताच जिल्हा प्रशासन, पोलीस, अग्निशमन आणि आरोग्य विभागाची पथके तत्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि समन्वयाने बचावकार्य सुरू करण्यात आले. या संपूर्ण प्रतिसादाचे नेतृत्व पालघरचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (DDMO) विवेकानंद कदम यांनी केले.
गुजरात गॅस लिमिटेडने तातडीने अंतर्गत आपत्कालीन प्रोटोकॉल सक्रिय करत गॅस प्रवाह थांबवण्यासाठी अपस्ट्रीम व्हॉल्व्ह बंद केले. तसेच गॅस मॉनिटरिंग करून परिसर सुरक्षित असल्याची खात्री करण्यात आली. मेसर्स GAIL च्या म्युच्युअल एड टीमनेही तांत्रिक आणि कार्यात्मक सहाय्य पुरवले.
दरम्यान, पोलीस विभागाने परिसराला वेढा घालत मुख्य रस्त्यावरील वाहतूक नियंत्रणात ठेवली आणि नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवले. आरोग्य विभागाच्या सिव्हिल सर्जन डॉ. वैभवी देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णवाहिका पाठवून जखमींना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली आणि त्यांना सुरक्षितपणे रुग्णालयात हलवण्यात आले. अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी वैभव तांडेल यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन गॅस पुरवठा वेगळा केल्यानंतर आग यशस्वीरित्या विझवली.
सुमारे ४० मिनिटांत संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या कवायत सरावा
मुळे विविध विभागांतील समन्वय, आपत्कालीन सेवांचा वेळेवर प्रतिसाद आणि मोठ्या औद्योगिक दुर्घटनांना सामोरे जाण्याची जिल्ह्याची तयारी अधोरेखित झाली.
गुजरात गॅस लिमिटेडचे ठाणे जीए सर्कल हेड भावेश दवे यांनी यावेळी बोलताना, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बोईसर येथे जीजीएलचे २४x७ आपत्कालीन प्रतिसाद पथक तैनात असून रस्ते किंवा सोसायटी परिसरात कोणतेही खोदकाम सुरू करण्यापूर्वी “६३५९९-९९००३” या जीजीएलच्या २४x७ आपत्कालीन क्रमांकावर आगाऊ माहिती देण्याचे आवाहन प्रशासनाने आणि कंपनीने केले आहे. यामुळे पाइपलाइनचे नुकसान तसेच संभाव्य आगीच्या घटना टाळण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.