ठेकेदाराचे २१ कोटीचे बिल अदा न केल्यामुळे मनोर येथील ट्रॉमा सेंटरचे काम गेली दोन वर्ष रखडल्याची माहिती समोर आली आहे. पालघर सामाजिक कृती गटातर्फे जव्हार येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालया समोर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी आयोजित धरणे आंदोलना दरम्यानच्या चर्चेत ही माहिती समोर आली. साहजिकच २१ कोटीमुळे तब्बल दोन वर्ष रुग्णालयाचे काम रखडले असल्यास, शासन आणि आपले खासदार - आमदार आदी लोकप्रतिनिधी करतात तरी काय हा प्रश्न उपस्थित होतो.
जिल्ह्यासाठी अलीकडे आणि गेल्या काही वर्षात हजारो कोटीचे प्रकल्प मंजूर आणि कार्यान्वित होत असताना केवळ २१ कोटीसाठी रुग्णालयासारखा मूलभूत प्रकल्प रखडावा याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अलीकडे जिल्हा नियोजन समितीच्या सभेत देखील हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर ठेकेदाराची देणी थकलेली असल्याची माहिती समोर आली. मात्र त्यावेळी हे देणे चुकवून रुग्णालयाची उर्वरित कामे पूर्ण करून रुग्णालय तात्काळ सुरू करण्याच्या बाबतीत कोणतीही ठोस घोषणा केली गेली नाही. मनोर येथील 200 खाटांचे हे रुग्णालय जिल्ह्याची एक महत्त्वाची गरज भागवणार आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर अनेक अपघात दररोज होत असतात त्या दृष्टीनेही या रुग्णालयाचे महत्त्व आहे. साहजिकच विमानतळ आणि चौथी मुंबई आदी प्रकल्प शासनाला महत्त्वाचे वाटतात मात्र रुग्णालयासारखी पालघर जिल्हा आणि आदिवासी बहुल जिल्हाची गरज भागविण्यात शासन आणि इथल्या लोकप्रतिनिधींना स्वारस्य नाही किंवा ते उदासीन आहेत असेच यातून दिसून येते.
आता हे २१ कोटी लगेच उपलब्ध होतील का आणि उपलब्ध झाल्यानंतर आवश्यक पदभरती तसेच रुग्णालयासाठी आवश्यक उपकरणे आदीची पूर्तता किती काळात होईल याचे उत्तर शासनाकडून मिळायला हवेअशी मागणी पालघर सामाजिक कृती गटाच्या ज्योती केळकर, मधु धोडी, सुजाता आयरकर, अश्विनी ठाकरे, वर्षा फातरफेकर, मीना धोदडे, गीता पागी, विनिता निंबकर,विजया घरत आदींनी केली आहे.