स्फोटामुळे घरे, शाळांसोबतच वन्यजीवांच्या झालेल्या नुकसानीबाबत प्रशासनाचे कानावर हात

Date: 2026-01-15
news-banner
नवयुग पालघर ०४ जानेवारी 

स्फोटामुळे घरे, शाळांसोबतच वन्यजीवांच्या झालेल्या नुकसानीबाबत प्रशासनाचे कानावर हात

 पालघर तालुक्यातील विराथन बुद्रुक -जलसार येथील बुलेट ट्रेन साठीच्या बोगद्याचा टप्पा यशस्वी केल्याची घोषणा करणारे रेल्वेमंत्री किंवा बुलेट ट्रेन प्राधिकरण हा बोगदा करताना करण्यात आलेल्या सुरुंग स्फोटामुळे परिसरातील घरांना आणि शाळांना जी भगदाडे पडलेली आहेत त्याची भरपाई देण्यात अयशस्वी ठरले याचा मात्र कुठे उल्लेख करताना दिसत नाहीत. पालघर जिल्ह्यातील विविध प्रकल्पां संबंधातील वेगवेगळ्या टप्प्यातील यशाची माहिती संबंधित प्राधिकरण किंवा जिल्हा प्रशासनामार्फत दिली जाते. मात्र त्याचबरोबर या प्रकल्पांमुळे बाधितांच्या ज्या अडचणी किंवा समस्या उभ्या राहतात, त्या सोडवण्यात प्रशासन तथा प्राधिकरण अपयशी ठरल्याचा अनुभव संबंधित घेत आहेत. 
 बुलेट ट्रेनसाठी बोगदा करताना मोठ्या प्रमाणावर सुरुंग स्फोट घडवून आणले जातात. या स्फोटांमुळे सुरुवातीपासूनच अनेक घरांना तसेच शाळा अंगणवाड्याच्या इमारतींना तडा गेल्याचे दिसून आले. त्याबाबतीत ग्रामस्थांसह सर्वांनी तक्रारीही केल्या. त्या-त्यावेळी सर्वेक्षण झाले व आम्ही याची नुकसान भरपाई देऊ असे सांगण्यात आले. मात्र आजवर यापैकी कोणालाही नुकसान भरपाई मिळाल्याचे दिसत नाही. या प्रकल्पासाठी संरक्षित आणि राखीव वन क्षेत्र वापरण्यात आले आहे. परिणामी हे काम करत असताना येथील वन्यजीवांचे काय ? याचे उत्तर प्राधिकरण देऊ शकले नाही. आजवर येथे अनेक वन्यजीवांना प्राणास मुकावे लागल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर अनेक पक्षांचे स्थलांतर झाले किंवा ते मृत झाल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगतात. यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडही झाली आहे. अशा वृक्षतोडीनंतर पर्यायी वनीकरण किंवा वृक्ष प्रत्यारोपणाचे काय झाले याची कोणालाही माहिती नाही. 
 प्रकल्पा संबंधात विविध कामांसाठी ग्रामसभेची परवानगी घेणे बंधनकारक असते.मात्र जलसार ग्रामपंचायतचा प्रत्यक्षात ठराव नसतानाही सरपंच व उपसरपंच यांच्या सहीने फसवणूक करुन ठराव दाखवून परवानगी घेतल्याचे धाखवल्याचे समजते.या पत्रात १६ जानेवारी २०२४रोजीच्या सभेत ही परवानगी देण्यात आली असून हे पत्र ग्रामपंचायतकडून गेल्याचे दिसून येते. प्रत्यक्षात १६ जानेवारी २०२४ च्या सभेच्या इतिवृत्तात मात्र प्रत्यक्षात या ठरावाच्या जागी दुसराच ठराव दिसून येतो. याचा अर्थ ज्या ठरावाच्या आधारे परवानगी दिल्याचे दाखवले जाते तो ठरावच संबंधित ग्रामसभेत झाल्याचे आढळून येत नाही. असे एक ना अनेक गैरप्रकार येथे घडले आहेत. 
  या प्रकल्पासाठी आरएमसी प्लांट तसेच क्रशर बसवला आहे. यामुळे परिसरात ध्वनी प्रदूषण तसेच धुळीचे परिसरात पसरणारे साम्राज्य या पर्यावरणीय बाबीकडे कोणाचे लक्ष नाही.बुलेट ट्रेन प्राधिकरण आपल्या कर्तबगारीचा डांगोरा पिटत असताना बाधित आणि परिसरातील ग्रामस्थांच्या गार्‍हाण्याचे आवाज मात्र त्यांच्यापर्यंत पोचत असल्याचे दिसत नाही.

Leave Your Comments