नवयुग पालघर विशेष : ११ जानेवारी :
पत्रकारिता सामाजिक अन्यायाला आव्हान देणारे माध्यम - मीना मेनन
पत्रकारिता ही केवळ माहिती देण्याची प्रक्रिया नसून सामाजिक अन्यायाला आव्हान देणारे प्रभावी माध्यम आहे, असे ठाम प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मीना मेनन यांनी केले. पालघर जिल्हा पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. “पत्रकारितेत तेच लोक येतात ज्यांना समाजात काहीतरी बदल घडवायचा असतो. चूक दाखवून तिच्याविरुद्ध उभे राहणे, हेच या माध्यमाचे खरे उद्दिष्ट आहे. म्हणूनच पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते. मात्र गेल्या दोन–तीन दशकांत हा स्तंभ अक्षरश: उद्ध्वस्त केला गेला असून हेच आजचे सर्वात मोठे आव्हान आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मेनन म्हणाल्या की, “रविश कुमार, राजदीप सरदेसाई यांसारख्या प्चांगले आणि निर्भीड पत्रकारांना देखील मुख्य प्रवाहातील माध्यमांऐवजी स्वतंत्र व्यासपीठ शोधण्यास भाग पाडत आहेत.यूट्यूबसारख्या माध्यमांवर आपले व्यासपीठ उभारावे लागत आहे. असे निदर्शना आणून देत
पत्रकारितेचे मूलभूत अधिष्ठान आज थरथरत आहे,” असे त्यांनी नमूद केले. पुरस्कारप्राप्त पत्रकारांचा संदर्भ देत, पालघरसारख्या भागात गंभीर प्रश्नांवर काम करणारे स्थानिक वार्ताहर आशेचा किरण असल्याचे त्यांनी सांगितले. “मुंबईजवळ असूनही पालघरमध्ये इतक्या समस्या आहेत की रोज एक नवी स्टोरी लिहिण्याचा वाव आहे,” असेही त्या म्हणाल्या.
“बुलेट ट्रेन, फ्रेट कॉरिडॉर, बंदर असे प्रकल्प आणले जातात, पण ग्रामीण भागातील रस्ते, आरोग्य, पाणी या समस्यांकडे सर्वांचे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास आणून देत, खेड्यापाड्यातील लोक मेले तरी चालतील, अशीच मानसिकता या व्यवस्थेमध्ये तयार झाल्याचे दिसते. याला आव्हान देण्याचे काम इथले पत्रकार करत आहेत, हे महत्त्वाचे आहे.”असेही त्यांनी सांगितले.
स्वतंत्र माध्यमांच्या भूमिकेवर भाष्य करताना त्या म्हणाल्या, “ही एक दिलासादायक बाब आहे की ‘द वायर’, ‘स्क्रोल’, ‘आर्टिकल १४’ आणि अनेक स्वतंत्र यूट्यूब चॅनेल्स आज महत्त्वाचे काम करत आहेत. मात्र त्यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे फंडिंग. सरकार वेगवेगळ्या कारणांनी ते बंद करते. ‘आर्टिकल १४’चे एफसीआरए काढून घेताना ‘जर्नालिझम इज नॉट पब्लिक पर्पज’ असे सांगितले गेले. वर्षानुवर्षे आपण पत्रकारितेला सार्वजनिक सेवा मानले, मग आज तिचा अर्थ काय उरतो?”
टीव्ही घडवून आणल्या जाणार्या चर्चाचा संदर्भ देत, – फक्त टीआरपीसाठी, आजची टीव्ही पत्रकारिता ही माहितीऐवजी केवळ करमणूक बनली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. १९८० च्या दशकात आम्ही फील्डवर जाऊन लोकांशी बोलून बातम्या करत होतो अशी आठवण त्यांनी करुन दिली.
पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे वास्तव समोर आणताना मेनन यांनी सांगितले, “मी पेठमध्ये राहते. माझी आई म्हणते – ‘इथे हॉस्पिटलच नाही, काही झालं तर काय?’ आजही वापी किंवा सेलवासला जावे लागते. अॅम्ब्युलन्स आहे, पण ड्रायव्हर नाही. एक्स-रे मशीन आहे, पण तंत्रज्ञ नाही. बदल होतो आहे, पण तो अत्यंत संथ गतीने.”
शिक्षण, शेती आणि प्रशासनातील अडथळ्यांकडे लक्ष वेधताना त्या म्हणाल्या, “माझ्या शेजारील शाळेत एकच शिक्षक अनेक मुलांना शिकवतो. ५०–६० टक्के लोक अजूनही गावात राहतात. हवामान बदलामुळे पीक फसते. नुकसानभरपाईसाठी अर्ज करताना अर्धा–एक दिवस जातो. आधार, रेशन कार्ड वेळेवर मिळत नाही. सामान्य माणसाला जितका त्रास देता येईल तितका इथे दिला जातो.”असे त्या संतापून म्हणाल्या.
r पत्रकारितेचा मुख्य उद्देश असतो – अन्याय उघड करणे आणि दोषींना शिक्षा मिळवून देणे. आपण गप्प बसलो नाही, हेच खरे समाधान असून सत्य आणि सामाजिक न्याय हाच पत्रकारितेचा पाया असल्याचे त्या म्हणाल्या”
सूर्या धरणाच्या पाण्यावरून सुरू असलेल्या संघर्षाचा उल्लेख करत त्या म्हणाल्या, “ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा पाणीसाठा आज मुंबईकडे वळवला जातो. सूर्या धरण मूळत: आदिवासींसाठी बांधले होते. यंदा आदिवासींचे भाताचे पीक फसल्याने त्यांनी आंदोलन केले आणि प्रशासनाला भूमिका बदलावी लागली.”
या भागातील चळवळींचा इतिहास आठवण करून देताना मेनन म्हणाल्या, “गोदाताई परुळेकर, काळूराम धोदडे यांच्यापासून जमीन आदिवासींना मिळवून देण्याची लढाई सुरू झाली. हा वारसा महत्त्वाचा आहे. पत्रकार आणि लोकांनी मिळून ही लढाई पुढे न्यायची आहे. पत्रकार एकटे परिवर्तन घडवू शकत नाहीत; लोकांनीही रस्त्यावर उतरून आपले हक्क ठामपणे मागितले पाहिजेत.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पालघर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार संघाच्या वाटचालीचा आढावा घेतला. ”तसेच २०२४-२५ या मागील वर्षातील उत्कृष्ट पत्रकारितेचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन खोडाळा येथील भगवान खैरनार, मोखाडा येथील रवी साळवे व वाणगाव येथील योगेंद्रसिंह ठाकूर यांचा सन्मान करण्यात आला. याचबरोबर याच कार्यक्रमादरम्यान सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांचा अलीकडेच त्यांना मुंबई विद्यापीठातर्फे मिळालेल्या उत्कृष्ट शिक्षक व प्राचार्य पुरस्कारा निमित्त, उपप्राचार्य डॉ. तानाजी पोळ यांचा त्यांना मुंबई विद्यापीठातर्फे मिळालेल्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारनिमित्त व उपप्राचार्य महेश देशमुख यांचा त्यांना मिळालेला राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्कार व पीएचडी पदवी प्राप्त केल्यानिमित्त सन्मान करण्यात आला.
जिल्हा पातळीवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून प्रतिनिधित्व करणारे जेष्ठ पत्रकार हितेंद्र नाईक (लोकमत ),संतोष चुरी (पुण्यनगरी), सचिन जगताप (सामना) निखिल
मेस्री (दैनिक सकाळ ),हनिफ शेख (पुढारी) यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच शिक्षण, क्रीडा व अन्य क्षेत्रातील नैपुण्यासाठी पत्रकार संघाच्या सदस्यांच्या पाल्यांचाही गुणगौरव करण्यात आला. यामध्ये ङदया योगिता संतोष चुरी, सानिया शबाना समीर मणियार, शौर्य अर्चना निखिल मेस्री, लावण्या विभूती वैभव मेस्त्री, दक्ष कांचन सचिन जगताप, इशिका मानसी नवीन पाटील, माहेरुर तय्यब्बा रियाज मुलॢा तेजस्चिनी रविना रवींद्र घरत आदींचा समावेश आहे. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार लाभलेल्या योगेंद्र ठाकूर यांनी आपल्या मनोगतात, सकारात्मक पत्रकारिता करणार्याचा इथे पुरस्कार होत असल्याबद्दल आनंद झाल्याचे सांगितले तसेच हा पुरस्कार माझ्यासाठी महत्त्वाचा असल्याचेही ते म्हणाले.पुरस्कारासाठी पात्र पत्रकारांची निवड संध्या शहापुरे, प्रा.विवेक कुडू व उमेश कवळे आदि सदस्यांच्या निवड समितीने केली.
यावेळी बोलताना अन्य वक्ते ज्येष्ठ पत्रकार वेंकट अय्यर यांनी पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. पण गेले दहा–पंधरा वर्ष हा आरसा जरा तिरका झाल्यामुळे सामान्य माणूस त्यात दिसेनासा झाला आहे, अशी स्पष्ट व परखड टीका आपल्या भाषणात केली. माध्यमांनी पुन्हा एकदा सामान्य माणसाच्या वेदना, प्रश्न आणि वास्तव दाखवायला हवे, असे ठाम मत त्यांनी मांडले.
आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी अत्यंत हळवी आठवण सांगून केली. “लहानपणी सकाळी उठलो की पहिली नजर दाराकडे जायची. वर्तमानपत्राची घंटी कधी वाजते याची वाट बघायची.सुरुवातीला कार्टूनसाठी, नंतर क्रीडा पानांसाठी आणि पुढे सिटी पेज, विशेष पाने व अखेर संपादकीयांपर्यंत आपला वाचनप्रवास गेला, असे नमूद करत “पन्नास वर्षांपूर्वी सुरू झालेली ही सवय आजही तशीच टिकून आहे,” असेही ते म्हणाले.
पत्रकार दिनाच्या इतिहासाचा उल्लेख करताना वेंकट अय्यर म्हणाले की, १८३२ साली बाळशास्री जांभेकर यांनी सुरू केलेले पहिले मराठी वर्तमानपत्र ‘दर्पण’ हेच पत्रकारितेचे मूळ आहे. “दर्पण म्हणजे आरसा. पत्रकाराची ओळख यापेक्षा सुंदर शब्दात होऊच शकत नाही. आरसा कधी खोटं दाखवत नाही. केस नसतील तर तो तेही तसंच दाखवतो. तो फक्त सत्य दाखवतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र आजचा आरसा तिरका झाल्याची खंत व्यक्त करताना ते म्हणाले, “आज मंत्री, खासदार, आमदार, मोठे नेते यांचंच प्रतिबिंब जास्त दिसतं. सामान्य माणूस या आरशातून गायब झाला आहे. सरकार काय म्हणतं, तेच जास्त झळकतं. पण ज्यांच्यासाठी सरकार आहे, त्या सामान्य माणसाच्या वेदना दिसत नाहीत.”
पत्रकारांनी पुन्हा आपल्या मूळ भूमिकेकडे परतावे, असे आवाहन करत ते म्हणाले, “सामान्य माणसाची अडचण, त्याच्या वेदना, त्याचं जगणं आरशातून काढून टाकू नका. कारण त्याच्या वेदनांमुळेच समाज जिवंत आहे. “आज लोकांना वाटतं, आपण बोललो तरी काही बदलणार नाही. पण लोकांना जागं करणं, रस्त्यावर आणणं आणि सरकारला बदल घडवायला भाग पाडणं हे काम केवळ पत्रकारच करू शकतो,” असे ते म्हणाले.
“पाहिलेली माणसे गेली कुठे?”आरशाला भावलेली माणसे गेली कुठे?””या कवी सुरेश भट यांच्या ओळींचा संदर्भ देत, ज्येष्ठ पत्रकार वेंकट अय्यर यांनी ‘दर्पण’च्या माध्यमातून समाजासमोर उभ्या केलेल्या मूल्यनिष्ठ पत्रकारितेचा उल्लेख करत, सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी पत्रकारितेच्या सामाजिक भूमिकेवर अत्यंत परखड भाष्य केले.”ते म्हणाले, “त्या काळात समाजासाठी झटणारी, आरशाला भावणारी, उत्तुंग माणसे होती. आज ती फार कमी दिसतात. अशा उंचीच्या माणसांना शोधून समाजासमोर आणण्याचे काम पत्रकार करत असतात. त्यामुळेच तुम्ही आमचे केवळ प्रतिनिधी नाही, तर आमचे आधारस्तंभ आहात.””पत्रकार नसते तर देशाची अवस्था काय झाली असती, याचा विचार करताना सावे म्हणाले, “आज जी परिस्थिती आपण पाहतो आहोत, त्यावरून असं वाटतं की पत्रकार नसते तर अनेकांनी हा देश विकून खाल्ला असता. पत्रकार आहेत म्हणूनच आपण – सामान्य माणसं – सन्मानाने जीवन जगू शकतो. ”पालघरमधील वसतीगृृहाचा संदर्भ देत, पत्रकारांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पालघर येथील २४० विद्यार्थी क्षमतेचे वस्तीगृह वाढवून नव्याने ५०० विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे नवे वस्तीगृह मंजूर झाले आहे. “ही लेखणीची ताकद आहे,” असे ते म्हणाले.”आपल्या भाषणात त्यांनी समाजबदल घडवणार्या ”बिहारमधील जांती देवी — ‘बांबू सायकलवाली शिक्षिका’ यांचा (जांती देवी यांनी बांबूपासून सायकली तयार केल्या, त्या विकून मिळालेल्या पैशांतून गरीब, आदिवासी व दलित मुलींसाठी शाळा सुरू केली.) तसेच कर्नाटकातील पद्मश्री पुरस्कारप्राप्त सालीउम्माराडा थिम्मक्का (३०० हून अधिक वडाची झाडे लावून पाण्यासाठी मैलोनमैल चालत तिने ती झाडे वाचवली.) या अत्यंत गरीब मजूर स्रीचे उदाहरण देत अशी उत्तुंग माणसं पत्रकार समाजासमोर आणतात. त्यामुळे आपल्यालाही काहीतरी चांगलं करावं अशी ऊर्जा मिळते.यावरूनच पत्रकारितेचं समाजातील महत्त्व स्पष्ट होतं,” असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष हनीफ शेख यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय विभूती मेस्री व निखिल मेस्री यांनी केला. आभार कोषाध्यक्ष पंकज दामोदर राऊत यांनी मानले.