नवयुग पालघर
**राष्ट्रीय युवा संसदेत प्राचार्य डॉ. किरण सावे ‘गौरव पुरस्काराने सन्मानित’**
मुंबई : युवकांमध्ये लोकशाही मूल्ये, राज्यघटनेची जाणीव आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित राष्ट्रीय युवा संसद अधिवेशनात पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण जयदेव सावे यांना ‘गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. युवक बिरादरी (भारत) आणि श्री विलेपार्ले केळवणी मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मुंबईतील मिठीबाई कॉलेजच्या मुकेश पटेल ऑडिटोरियममध्ये पार पडलेल्या या अधिवेशनात देशभरातून सुमारे पाच हजार युवक सहभागी झाले होते. युवकांना लोकशाही प्रक्रियेचे प्रशिक्षण देऊन सक्षम नेतृत्वाची नवी पिढी घडविणे हा या युवा संसदेचा मुख्य उद्देश होता. अंतिम फेरीत निवड झालेल्या २५ युवकांनी देशातील विविध ज्वलंत प्रश्नांवर तसेच भारतासारख्या संघराज्य व्यवस्थेत केंद्र व राज्य यांच्यात वाढत असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक उपायांवर अभ्यासपूर्ण मते मांडली. आयएएस अधिकारी, विद्यापीठांचे कुलगुरू आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अशा पाच सदस्यीय समितीने स्पर्धेतील उत्कृष्ट युवकाची ‘सर्वोत्कृष्ट युवाभूषण’ पुरस्कारासाठी निवड केली.
या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना डॉ. नरेंद्र जाधव यांनी भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य अधोरेखित करत ती जगातील सर्वोत्तम राज्यघटनांपैकी एक असल्याचे सांगितले. अनेक लोकशाही राष्ट्रांसाठी भारतीय राज्यघटना आदर्श ठरली असून ब्रिटिशांनी भारताबाबत केलेले नकारात्मक भाकित या राज्यघटनेने खोटे ठरवले, असे त्यांनी नमूद केले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून राज्यघटना बनविण्याचे प्रयत्न सुरू होते आणि १८९८ पासून लोकमान्य टिळक, पंडित मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू आदी नेत्यांनी त्यासाठी प्रयत्न केले होते. राज्यघटना अमलात येण्यापूर्वी अशा बारा प्रयत्नांचा इतिहास असून त्यापैकी आठ प्रयत्नांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहभागी होते, ही महत्त्वाची बाब अनेकांना ठाऊक नसल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार केतकर यांनी जागतिक राजकारणावर भाष्य करताना आज जगभर अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले. महासत्तांच्या स्वार्थी धोरणांमुळे अनेक देशांमध्ये तणाव वाढत असून अमेरिका व इस्रायलच्या युद्धखोर धोरणांमुळे जगासमोर संकटे निर्माण होत असल्याची त्यांनी खंत व्यक्त केली. अशा परिस्थितीत भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राने संतुलित आणि तटस्थ परराष्ट्र धोरण कायम ठेवत आवश्यकतेनुसार ठाम भूमिका घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी प्राचार्य डॉ. किरण जयदेव सावे यांच्या शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला. पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे जन्मलेल्या डॉ. सावे यांच्यावर बालपणापासूनच गांधीवादी विचारांचे संस्कार झाले. वाचनाची आवड, निसर्गाशी जुळलेली नाळ आणि सामाजिक जाणीव यांमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून तत्त्वज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी. संपादन केली. १९९३ पासून सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत राहून त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. २००९ ते २०१७ या कालावधीत उपप्राचार्य म्हणून आणि २०१७ पासून प्राचार्य म्हणून त्यांनी महाविद्यालयाचे प्रभावी नेतृत्व केले आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाला अखिल भारतीय स्तरावरील “१०० सर्वोत्तम महाविद्यालये” या क्रमवारीत सलग सहा वर्षे स्थान मिळाले. तसेच २०१७ मध्ये मुंबई विद्यापीठाचा “सर्वोत्तम महाविद्यालय” हा सन्मानही प्राप्त झाला. २०२३ मध्ये “प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान” अंतर्गत पाच कोटी रुपयांचे अनुदान मिळवून देण्यातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत समाजोपयोगी उपक्रम, संशोधनपर लेखन आणि मागील ३५ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन युवक बिरादरी (भारत) तर्फे त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे संस्थेचे चेअरपर्सन डॉ. राम चढ्ढा आणि व्हाईस प्रेसिडेंट रोहिणी हटंगडी यांनी सांगितले.कार्यक्रमाला डॉ. मृदुल निळे आणि डॉ. स्वरक्रांती शाह आदी मान्यवर उपस्थित होते.
सन्मान स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी राज्यघटनेविषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये, विशेषतः युवकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी कार्यरत असलेल्या युवक बिरादरीसारख्या राष्ट्रीय संस्थेकडून मिळालेला हा सन्मान अत्यंत प्रेरणादायी असून हा पुरस्कार केवळ वैयक्तिक नसून सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, संस्थेचे व्यवस्थापन, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचा गौरव असल्याची भावना व्यक्त केली. या सन्मानाबद्दल प्राचार्य डॉ. किरण सावे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.