थायलंडमधील फुकेत (Phuket) येथे ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडलेल्या अबू धाबी कॉम्बॅट क्लब सबमिशन ग्रॅपलिंग चॅम्पियनशिप २०२५ (ADCC Submission Grappling Championship 2025) या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताने झळाळता विजय मिळवला.

Date: 2025-10-16
news-banner
https://youtu.be/a5nKw4zyILs?si=mC7pbGFirVLPAa0_

थायलंडमधील फुकेत (Phuket) येथे ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडलेल्या अबू धाबी कॉम्बॅट क्लब
सबमिशन ग्रॅपलिंग चॅम्पियनशिप २०२५ (ADCC Submission Grappling Championship 2025) या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताने झळाळता विजय मिळवला. या स्पर्धेत भारताने एकूण ७ पदके — ४ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कास्य — अशी ऐतिहासिक कमाई करून जागतिक स्तरावर भारतीय ग्रॅपलिंगचा झेंडा फडकवला. या यशात पालघर जिल्ह्याच्या खेळाडूंचा सिंहाचा वाटा असून एंजल यतिन पाटील, विवेक गोपाळ उपाध्याय, कुमद अंबिका ठाकूर आणि सिद्धार्थ मिलिंद दवडा या चारही खेळाडूंनी आपल्या जिद्दीने भारताचा मान उंचावला.

मल्लयुद्ध(Grappling) हा खेळ जगभरात लोकप्रिय असलेल्या मिक्स्ड मार्शल आर्ट्सच्या (Mixed Martial Arts – MMA) महत्त्वाच्या प्रकारांपैकी एक आहे. अबू धाबी कॉम्बॅट क्लब ही स्पर्धा या क्रीडा प्रकारातील सर्वोच्च दर्जाची स्पर्धा मानली जाते. या वर्षी भारताने विक्रमी 
७ पदकांची कमाई करून इतिहास रचला असून त्यात पालघरच्या खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले आहे.

पालघरच्या कोळगाव येथील एंजल यतिन पाटील (वय १६) हिने ५५ किलो नवशिक्या महिला
गटात (Beginners ) सुवर्ण पदक आणि मध्यम Intermediate गटात कास्य पदक (Bronze Medal) मिळवले. विशेष म्हणजे, एंजलने स्वतःच्या वयाच्या बाल गटा( Kids Category ऐवजी थेट महिला गटामध्ये भाग घेऊन हे यश संपादन केले. तिच्या या धाडसी निर्णयाने आणि आत्मविश्वासपूर्ण खेळाने तीने दाखवून दिले की वय नव्हे, आत्मविश्वासच खरी ताकद असते.

पालघरचे विवेक गोपाळ उपाध्याय यांनी वरिष्ठ मध्यम स्तर (Master Intermediate Absolute) गटात रौप्य पदक पटकावले. विवेक हे भारताच्या संघातील अनेक ग्रॅपलर्सचे प्रशिक्षक असून खेळाडू आणि मार्गदर्शक या दोन्ही भूमिकांतून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. कुमद अंबिका ठाकूर हिने ६० किलो नवशिक्या गटात सुवर्ण पदक मिळवून आपली कौशल्यपूर्ण कामगिरी सिद्ध केली. डहाणूच्या चिखला खाडीपाडा येथील सिद्धार्थ मिलिंद दवडा याने १७ वर्षाखालील ५५ किलो गटात रौप्य पदक
 जिंकून तरुण वयातच आत्मविश्वास आणि तांत्रिक कौशल्याचे उत्तम प्रदर्शन केले. याशिवाय कर्नाटकचे तुषार जे. म्हैसूर आणि तामिळनाडूचे प्रभू यांनी प्रत्येकी एक सुवर्ण पदक जिंकले.

वरील सर्व विजेते खेळाडू पालघर येथील “Factory MMA Academy” मध्ये प्रशिक्षण घेत आहेत. या संस्थेत मिक्स्ड मार्शल आर्ट्स (MMA) आणि ग्रॅपलिंगचे सखोल तांत्रिक प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षक विवेक उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली हे खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी सज्ज होत आहेत.

स्पर्धेपूर्वी एंजल पाटील, विवेक उपाध्याय आणि सिद्धार्थ दवडा हे तिघेही सिंगापूर आणि थायलंड येथे एक महिन्याच्या विशेष प्रशिक्षण शिबिरासाठी गेले होते. कठोर सराव, आहारशिस्त आणि मानसिक तयारी यांच्या जोरावर त्यांनी एडीसीसी फुकेत स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. एंजल पाटील म्हणाली, “बाल गटाऐवजी महिला गटामध्ये खेळण्याचा निर्णय धाडसी होता, पण तो योग्य ठरला. हा अनुभव मला पुढील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये अधिक ताकदीने खेळण्यासाठी प्रेरणा देईल.” विवेक उपाध्याय यांनी सांगितले, “ही स्पर्धा आमच्यासाठी अनुभवसंपन्न ठरली. पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचा झेंडा अधिक उंच ठेवण्याचे आम्ही लक्ष्य ठेवले आहे.”

या सर्व खेळाडूंनी सोशल मीडियावरून जनतेचे आणि पालकांचे आभार मानत सांगितले की, “आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही तुम्हाला निराश करणार नाही. पुढील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सुवर्ण झळकवू!”

पालघरच्या या तरुण खेळाडूंनी दाखवून दिले आहे की ग्रामीण भागातूनही आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्लयुद्ध (ग्रॅपलर्स) घडू शकतात. अबू धाबी कॉम्बॅट क्लब फुकेत २०२५ मध्ये पालघरचा झेंडा फडकवणाऱ्या या खेळाडूंच्या जिद्दीला आणि परिश्रमाला सलाम !

Leave Your Comments