राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका — नामनिर्देशनासाठी "संगणकप्रणालीद्वारे"
(ऑनलाईन)बरोबरच "पारंपारिक पद्धतीने" / "प्रत्यक्ष" / "स्वहस्ते"(ऑफलाईन) चीही सुविधा उपलब्ध
मुंबई : राज्यातील २४६ नगरपरिषद व ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५ साठी नामनिर्देशन दाखल प्रक्रिया आता "संगणकप्रणालीद्वारे" (ऑनलाईन) बरोबरच पारंपरिक पद्धतीने / प्रत्यक्ष / स्वहस्तेही करण्याची मुभा देण्यात आली आहे. संगणक प्रणालीत येत असलेल्या तांत्रिक अडचणींचा विचार करून राज्य निवडणूक आयोगाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. निर्धारित कार्यक्रमानुसार उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे संगणक प्रणालीद्वारे (ऑनलाईन) स्वीकारली जात होती; मात्र मागील काही दिवसांत संगणक (ऑनलाईन) प्रणालीवर ताण वाढल्याने अडचणी निर्माण होत असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले. नामनिर्देशन दाखल करण्यासाठी अवघे दोनच दिवस शिल्लक असताना उमेदवारांना समान संधी उपलब्ध व्हावी, यासाठी आयोगाने तातडीने पर्यायी सुविधा जाहीर केली.
१५ ते १७ नोव्हेंबरदरम्यान दोन्ही पद्धतीने नामनिर्देशन दाखल करण्याची परवानगी
आयोगाने जारी केलेल्या आदेशानुसार,
१५, १६ (रविवार, सार्वजनिक सुट्टी) आणि १७ नोव्हेंबर २०२५ या तीनही दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना आपली नामनिर्देशनपत्रे "संगणकप्रणालीद्वारे" (ऑनलाईन ) किंवा "पारंपारिक पद्धतीने" / "प्रत्यक्ष" / "स्वहस्ते" (ऑफलाईन) —दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करता येणार आहेत. आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य राहील.
जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मुख्याधिकारी तसेच जिल्हा पोलिस प्रमुखांना यासंदर्भात आवश्यक त्या सूचना प्रसारित करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशाने सचिव सुरेश काकाणी यांनी हे परिपत्रक जारी केले असून, आयोगाच्या निर्णयामुळे उमेदवारांना अंतिम क्षणीही नामनिर्देशन सादर करण्याची सोयीस्कर संधी उपलब्ध होणार आहे.