विराथन बुद्रुक-जलसार येथे बुलेट ट्रेनच्या राज्यातील पहिल्या पर्वतीय बोगद्याची खोदणी पूर्ण

Date: 2026-01-15
news-banner
नवयुग पालघर ०४ जानेवारी 

विराथन बुद्रुक-जलसार येथे बुलेट ट्रेनच्या राज्यातील पहिल्या पर्वतीय बोगद्याची खोदणी पूर्ण 

https://youtu.be/ir-Qa4aa9H8?si=DiaH-_dAn5TJR0XT

मुंबई–अहमदाबाद हाय स्पीड रेल अर्थात बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात पहिल्यांदाच पर्वतीय बोगद्याच्या खोदणीचे काम यशस्वी झालेआहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पालघर जिल्ह्यातील पर्वतीय बोगदा क्रमांक ५ आरपार खोदणी पूर्ण झाल्याची अधिकृत घोषणा केली. विरार आणि बोईसर बुलेट ट्रेन स्थानकांच्या दरम्यान असलेला सुमारे १.५ किलोमीटर लांबीचा हा बोगदा पालघर जिल्ह्यातील दीर्घ बोगद्यांपैकी एक आहे. हा बोगदा दोन्ही टोकांवरून खोदण्यात आला असून, अत्याधुनिक ड्रिल अँड ब्लास्ट पद्धत वापरून अवघ्या १८ महिन्यांत काम पूर्ण करण्यात आले.
 या पद्धतीमुळे बोगदा खोदताना जमिनीच्या हालचालींचे प्रत्यक्ष वेळेत निरीक्षण करता येते. त्यानुसार शॉटक्रीट (फवारणी काँक्रीट), रॉक बोल्ट्‌स (खडक पकडणारे बोल्ट) आणि लॅटिस गर्डर्स (जाळीदार लोखंडी आधार) अशा आवश्यक संरक्षक यंत्रणा बसवण्यात आल्या. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान वायुवीजन व्यवस्था, अग्निसुरक्षा उपाय तसेच सुरक्षित प्रवेश-निर्गमन मार्ग राखण्यात आल्याचा दावा केला आहे.
       यापूर्वी ठाणे ते बीकेसी दरम्यानचा सुमारे ५ किलोमीटर लांबीचा पहिला भूमिगत बोगदा सप्टेंबर २०२५ मध्ये पूर्ण झाला होता. एकूण ५०८ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात २७.४ किलोमीटर बोगदे असून, त्यात २१ किलोमीटर भूमिगत आणि ६.४ किलोमीटर भूपृष्ठावरील बोगद्यांचा समावेश आहे. प्रकल्पात एकूण आठ पर्वतीय बोगदे असून, त्यापैकी सात महाराष्ट्रात आहेत.
 केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करत असून, भविष्यातही कार्यान्वयनाच्या टप्प्यावर अनेक संधी उपलब्ध होतील. बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर मुंबई ते अहमदाबाद प्रवास अवघ्या १ तास ५८ मिनिटांत पूर्ण होईल, त्यामुळे दोन्ही महानगरांच्या अर्थव्यवस्थांचे अधिक सघन एकत्रीकरण होईल. प्रकल्प मार्गालगत औद्योगिक व आयटी हब्स विकसित होण्यास चालना देईल, तसेच ज्ञान हस्तांतरण आणि दीर्घकालीन आर्थिक लाभ साधेल. मध्यमवर्गासाठी आरामदायी व परवडणारा प्रवास हा बुलेट ट्रेनचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्तवाचा असून, रस्ते वाहतुकीच्या तुलनेत कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात सुमारे ९५ टक्के घट होणार असल्याचे म्हटले आहे.
             हा मार्ग साबरमती, अहमदाबाद, आणंद, वडोदरा, भरूच, सुरत, बिलीमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई या प्रमुख शहरांना जोडणार असून, भारताच्या आधुनिक वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये हा प्रकल्प महत्वाचा ठरणार असल्याचेही म्हटले आहे.

Leave Your Comments