पालघर जिल्ह्यात नागझरी व पेठ येथे ‘जल अर्पण दिवस’ उत्साहात साजरा प्रभातफेरी, गावसभा, जलप्रतिज्ञा

Date: 2026-02-17
news-banner
नवयुग पालघर : १६ फेब्रुवारी २०२६

पालघर जिल्ह्यात नागझरी व पेठ येथे ‘जल अर्पण दिवस’ उत्साहात साजरा
प्रभातफेरी, गावसभा, जलप्रतिज्ञा

पालघर : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला कायमस्वरूपी शुद्ध व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनांचे ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करत नागझरी (ता. विक्रमगड) व पेठ (ता. डहाणू) येथे ‘जल अर्पण दिवस’ विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत अनेक योजना प्रगतीपथावर असून, पूर्ण झालेल्या योजना संबंधित ग्रामपंचायतींकडे सुपूर्द केल्या जात आहेत. त्यानुसार १६ फेब्रुवारी २०२६ रोजी नागझरी व पेठ येथील पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनांचे हस्तांतरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अतुल पारसकर तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन सुरूम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान गावसभेत पाणीपुरवठा योजनेची सविस्तर माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. योजना दीर्घकाळ सुरळीत राहण्यासाठी देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ग्रामपंचायतीने स्वीकारत ग्रामस्थांकडून सहकार्याची हमी घेण्यात आली. पाण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची रॅली, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांची प्रभातफेरी तसेच जलप्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी शुद्ध पाण्याची खात्री करण्यासाठी एफ.टी.के. (Field Test Kit) किटद्वारे पाणी तपासणीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
पेठ (ता. डहाणू) येथील कार्यक्रम
पेठ येथे झालेल्या कार्यक्रमास जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन सुरूम, तालुका ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता रविराज अभंगराव, सरपंच लहू सातवी, उपसरपंच विनोद केदार, ग्रामपाणीपुरवठा समिती (VWSC) सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी सखाराम सातवी, समूह समन्वयक दिनेश पाडवी तसेच महिला बचत गट सदस्य, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
नागझरी (ता. विक्रमगड) येथील कार्यक्रम
नागझरी येथे ग्रामदान मंडळाचे अध्यक्ष रोहिदास डगला, उपाध्यक्ष नितीन डगला, सर्व ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार आत्माराम विशे, मनुष्य विकास सल्लागार संजय ठाकरे, गट समन्वयक यतीन घरत, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) चे अभियंता अक्षय सांबरे, ग्रामपंचायत अधिकारी किरण भोईर तसेच अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘जल अर्पण दिवस’ निमित्त राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे ग्रामस्थांमध्ये पाणी संवर्धन, स्वच्छता व पाणी व्यवस्थापनाबाबत जागरूकता वाढीस लागली असून, गावस्तरावर पाणीपुरवठा योजनांचे सुयोग्य व्यवस्थापन करण्याचा संकल्प करण्यात आला.

Leave Your Comments