पालघर मिनी सरस २०२६ : शिरगाव समुद्र किनाऱ्यावर महिला स्वयंसहायता समूहांचा भव्य विक्री-प्रदर्शन मेळावा

Date: 2026-02-17
news-banner
https://youtu.be/thTU5zshQ0s?si=cnJwyDm3w3Gc_W8W

नवयुग पालघर विशेष : आवर्जून भेट देऊया !

पालघर मिनी सरस २०२६ : शिरगाव समुद्र किनाऱ्यावर महिला स्वयंसहायता समूहांचा भव्य विक्री-प्रदर्शन मेळावा

ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाला आणि स्वावलंबनाला नवी झेप देणारा “पालघर मिनी सरस २०२६” भव्य विक्री व प्रदर्शन मेळावा १८ ते २२ फेब्रुवारीदरम्यान शिरगाव (पालघर) समुद्र किनाऱ्यावर, येथे रंगणार आहे. उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यात राज्यभरातील १०२ महिला स्वयंसहायता समूह सहभागी होत असून, ग्रामीण उद्योगांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रयत्न ठरणार आहे.

१०२ स्वयंसहायता समूहांचा सहभाग

या प्रदर्शनात पालघर जिल्ह्यातील ७३, रत्नागिरी १२, ठाणे ७, रायगड ५, पुणे २ तसेच नाशिक, जळगाव आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील प्रत्येकी १ अशा एकूण १०२ स्वयंसहायता समूहांचा सहभाग असणार आहे.
यामध्ये सुमारे ८० स्टॉल्स हस्तकला व विविध उत्पादनांचे तर २० स्टॉल्स स्वादिष्ट खाद्यपदार्थांच्या विक्रीचे असतील.

ग्रामीण कलेचा आणि चवींचा उत्सव

मेळाव्यात घरगुती मसाले, विविध पारंपरिक खाद्यपदार्थ, ग्रामीण हस्तकला, कलाकुसरीच्या वस्तू, वारली पेंटिंग, कापडी पिशव्या तसेच अन्य हस्तनिर्मित उत्पादने नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहेत. ग्रामीण महिलांच्या कौशल्याचा आणि आत्मविश्वासाचा हा उत्सव ठरणार असून, त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या ठिकाणी महिलांच्या सोयीसाठी नियंत्रण कक्ष आणि आरोग्य कक्षाचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

यंदा ‘ग्लोबल कोकण महोत्सवा’सोबत संयुक्त आयोजन

यावर्षी हा जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन मेळावा ग्लोबल कोकण महोत्सव सोबत संयुक्तपणे आयोजित करण्यात येत आहे. मुंबई व परिसरात मोठी ओळख असलेल्या या महोत्सवाला दरवर्षी सुमारे १ ते २ लाख नागरिक भेट देतात. त्यामुळे महिला स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळण्याची आणि स्वतःचा ग्राहकवर्ग निर्माण करण्याची सुवर्णसंधी यंदा उपलब्ध होणार आहे. पुढील काळात वर्षभर विविध व्यक्ती व संस्थांकडून ऑर्डर्स मिळण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मागील यशस्वी परंपरा

मागील दोन वर्षांत अशा प्रदर्शनांमधून दरवर्षी अंदाजे १५ ते २० लाख रुपयांची विक्री झाली असून सुमारे १० ते २० हजार नागरिकांनी भेट दिली होती. यंदा वाढलेल्या सहभागामुळे विक्रीतही लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे.

प्रशासनाचे आवाहन
स्वयंसहायता समूहांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे शासनाचे महत्त्वाचे ध्येय असल्याचे सांगत जिल्हाधिकारी पालघर डॉ. इंदूराणी जाखड तसेच जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,
१८ ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान सकाळी १० ते रात्री १० या वेळेत शिरगाव समुद्र किनारा, (पालघर) येथे कुटुंबासह उपस्थित राहून ग्रामीण महिलांच्या उत्पादनांची खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्यावे.

ग्रामीण उद्योजकतेचा उत्सव आणि महिलांच्या आत्मनिर्भरतेचा सन्मान — 
“पालघर मिनी सरस 2026” हा केवळ मेळावा नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा एक सशक्त उपक्रम ठरणार आहे.

Leave Your Comments