पालघर जिल्ह्यातील उद्योगांचा राज्य पातळीवर गौरव — सुवर्ण व रजत निर्यात पुरस्कारांनी सन्मानित

Date: 2025-10-16
news-banner
https://youtu.be/SpduS1tEuVw?si=ouM8HZ0UUjTFgDm5

🏆 पालघर जिल्ह्यातील उद्योगांचा राज्य पातळीवर गौरव — सुवर्ण व रजत निर्यात पुरस्कारांनी सन्मानित

राज्यातील उत्कृष्ट निर्यातदार उद्योजकांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय निर्यात पुरस्कार वितरण सोहळ्यात पालघर जिल्ह्यातील उद्योगांनी दमदार उपस्थिती दाखवली.

या सोहळ्यात डी’डेकोर प्रा. लि., सहयोग एक्स्पोर्ट्स प्रा. लि. आणि अमिटी लेदर इंटरनॅशनल या तीन निर्यातदार कंपन्यांना एकूण पाच प्रतिष्ठित राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले. हा सन्मान राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

🏅 पुरस्कार वितरण : 

तारापूर एमआयडीसी येथील डी’डेकोर प्रा. लि. या अग्रगण्य होम डेकोर फॅब्रिक उत्पादक कंपनीला मोठ्या उद्योग प्रवर्गातून २०२२-२३ साठी सुवर्ण निर्यात पुरस्कार तसेच २०२३-२४ साठी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

वसई येथील सहयोग एक्स्पोर्ट्स प्रा. लि. या कंपनीला लेदर उत्पादनांच्या निर्यातीसाठी लघुउद्योग प्रवर्गातून २०२२-२३ साठी सुवर्ण पुरस्कार मिळाला.

तर सफाळे येथील अमिटी लेदर इंटरनॅशनल या कंपनीला लेदर निर्यातीसाठी लघुउद्योग प्रवर्गातून २०२२-२३ साठी प्रमाणपत्र आणि २०२३-२४ साठी रजत पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले,

> “राज्याच्या निर्यातीचे प्रमाण दहापटीने वाढविण्याच्या उद्देशाने १२ नवीन उद्योग धोरणे तयार करण्यात आली आहेत. यात ईव्हीजीसी, जोसोसो, बांबू, लेदर, एरोस्पेस आणि इलेक्ट्रॉनिक्स यांसारखी महत्त्वाची क्षेत्रनिहाय धोरणे लवकरच लागू करण्यात येणार असून, त्यामुळे उद्योजकांना मोठा दिलासा मिळेल.”

📈 पालघरचा निर्यात क्षेत्रातील सातत्यपूर्ण वेग

पालघर जिल्हा निर्यातीच्या क्षेत्रात सातत्याने प्रगती करत आहे.
२०२२-२३ मध्ये रु. २७,४५० कोटी,
२०२३-२४ मध्ये रु. २८,२७८ कोटी,
तर २०२४-२५ मध्ये तब्बल रु. ३०,१३८ कोटींची निर्यात झाल्याची नोंद आहे.

जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड आणि उद्योग सहसंचालक विजू सिरसाठ यांनी पुरस्कारप्राप्त उद्योजकांचे अभिनंदन केले. जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सांगळे यांनी सांगितले की,
> “पालघर जिल्हा निर्यातीच्या क्षेत्रात चढत्या कमानीने प्रगती करत असून, ही कामगिरी संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.” या यशाबद्दल जिल्ह्यातील सर्व उद्योग क्षेत्रांतून उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

🏭 पुरस्कारप्राप्त कंपन्यांची ओळख

🌟 डी’डेकोर एक्स्पोर्ट्स प्रा. लि. – ‘क्लास टू मास’चा यशोगाथा

पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक परिसरात सुरू झालेल्या एका छोट्या उद्योगाने आज जागतिक स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्तेचा उच्च दर्जा आणि सततची नवकल्पना या बळावर डी’डेकोर एक्स्पोर्ट्स प्रा. लि. ने फॅब्रिक उद्योगात जगातील सर्वात मोठा उत्पादक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

१९९९ साली सुरू झालेल्या या कंपनीने केवळ २५ वर्षांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वेगाने झेप घेतली आहे. तारापूर MIDC औद्योगिक क्षेत्रात वसलेल्या या कंपनीत आज ३,००० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. उच्च तांत्रिक कौशल्य, दर्जेदार उत्पादन आणि जागतिक दर्जाचे डिझाईन यांचा मिलाफ करून डी’डेकोरने भारतीय वस्त्रउद्योगाला एक नवे रूप दिले आहे.

कंपनीकडे थ्री स्टार एक्स्पोर्ट हाऊस व AEO T-2 प्रमाणपत्र असून, ती ६५ देशांना निर्यात करते. पडद्यांचे कापड, फर्निशिंग मटेरियल्स, भरतकाम केलेले फॅब्रिक्स आणि ब्लाइंड्स यांच्या निर्मितीत डी’डेकोर आज जगातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते.

👞 सहयोग एक्स्पोर्ट्स प्रा. लि. – दर्जा, नवकल्पना आणि विश्वासार्हता

पालघर जिल्ह्यातील वसई येथील सहयोग एक्स्पोर्ट्स प्रा. लि. या कंपनीने महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत प्रदान करण्यात आलेला “निर्यात उत्कृष्टता पुरस्कार” जिंकून जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल केले आहे.

उच्च दर्जाची लेदर फूटवेअर आणि लेदर वस्तू तयार करून ती जगभरातील नामांकित ब्रँड्सपर्यंत पोहोचवणारी ही कंपनी आज जागतिक निर्यात क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव बनली आहे.

१९९० मध्ये मनीष दोशी यांनी स्थापन केलेली ही कंपनी सुरुवातीला मर्यादित उत्पादन क्षमतेसह कार्यरत होती. पण दर्जा, नवकल्पना आणि वेळेवर वितरण या तीन तत्त्वांवर आधारित कामकाजामुळे कंपनीने गेल्या तीन दशकांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे.

आज ती एक “टू स्टार एक्स्पोर्ट हाऊस” म्हणून ओळखली जाते आणि भारत सरकारमान्यताप्राप्त निर्यातगृह आहे.

👜 अमिटी लेदर इंटरनॅशनल – हातकलेपासून जागतिक बाजारपेठेपर्यंत

पालघर जिल्ह्यातील औद्योगिक विकासात आपला ठसा उमटवणारी अमिटी लेदर इंटरनॅशनल (Amity Leather International) ही कंपनी जागतिक पातळीवर भारतीय लेदर उत्पादनांना वेगळी ओळख निर्माण करत आहे.

१९७९ साली स्थापन झालेल्या या भागीदारी फर्मची स्थापना यू. सी. सिंग आणि त्यांच्या पत्नी श्रीमती सिंग यांनी केली. भारतातील दर्जेदार लेदर उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेण्याचा त्यांचा संकल्प आज प्रत्यक्षात उतरला आहे.

कंपनीने आपल्या प्रवासाची सुरुवात केवळ २००० चौ.फुट क्षेत्रफळात आणि १५ कारागीरांपासून केली होती. सर्व उत्पादन हाताने तयार केले जात होते. आज कंपनीचे उत्पादन केंद्र तब्बल ३५,००० चौ.फुट क्षेत्रात विस्तारले असून, १०० पेक्षा अधिक कुशल कर्मचारी येथे कार्यरत आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या कारखान्याचा वार्षिक एकूण उलाढाल सुमारे ७.२५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (निर्यात आणि Domestic विक्रीसह) इतकी आहे.

🔚 पालघर जिल्ह्यातील या तीन उद्योगांच्या कामगिरीमुळे जिल्हा आता राज्यातील अग्रगण्य निर्यात केंद्र म्हणून झळकू लागला आहे. गुणवत्तेवर आधारित उत्पादन, नवकल्पक दृष्टीकोन आणि जागतिक दर्जाची उंची गाठण्याचा हा प्रवास जिल्ह्यासाठी खऱ्या अर्थाने अभिमानाचा ठरला आहे.

Leave Your Comments