पोलीस शिपाई भरती : आमिषाला बळी पडू नका

Date: 2026-02-17
news-banner
नवयुग पालघर १५ फेब्रुवारी :

पोलीस शिपाई भरती : आमिषाला बळी पडू नका

    पालघर जिल्ह्यातील पोलीस शिपाई भरतीअंतर्गत केवळ १६५ रिक्त पदांसाठी तब्बल ९१०९ उमेदवारांनी अर्ज केल्याने प्रचंड प्रतिसादाच्या समाधानाबरोबरीने तरुणांमधील बेकारीचे चित्रही समोर आले आहे. 
 १४ फेब्रुवारीपर्यंत झालेल्या मैदानी चाचणीत १९२० उमेदवारांपैकी १५१३ जण पात्र ठरले असून ४०७ उमेदवार अपात्र ठरले आहेत. पालघर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदाच्या १५८ तसेच चालक पोलीस शिपाई पदाच्या ७ अशा एकूण १६५ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ११ फेब्रुवारी २०२६ पासून २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत कोळगाव (पालघर) येथील पोलीस मुख्यालयाच्या परेड ग्राउंडवर मैदानी चाचणी सुरू आहे.
 या भरतीसाठी एकूण ९१०९ अर्ज प्राप्त झाले असून त्यामध्ये ७७६३ पुरुष व १४४६ महिला उमेदवारांचा समावेश आहे. १४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत १९२० उमेदवार प्रत्यक्ष मैदानी चाचणीस हजर झाले. त्यापैकी १५१३ उमेदवारांनी पात्रता मिळवली असून ४०७ उमेदवार विविध कारणांमुळे अपात्र ठरले आहेत.
 भरती प्रक्रिया पारदर्शक व निपक्षपाती राहावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेरे, स्टॅटिक कॅमेरे आणि हॅन्डीकॅमद्वारे केले जात आहे.
 उमेदवारांच्या सोयीसाठी मैदानावर कॅन्टीनची व्यवस्था करण्यात आली असून केळी, बिस्कीट, पिण्याचे पाणी व ओआरएस उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच मैदानी चाचणीदरम्यान दुखापत झाल्यास तत्काळ उपचारासाठी वैद्यकीय पथक तैनात असून अॅम्ब्युलन्स सज्ज ठेवण्यात आली आहे.
लांबून येणार्‍या उमेदवारांच्या निवासासाठी आंबामाता मंदिर (पाचबत्ती नाका, पालघर), उमरोळी ग्रामपंचायत हॉल (उमरोळी) आणि पद्मनाभ स्वामी मंदिर (टेंभोडे) येथे निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
 ही भरती प्रक्रिया पूर्णत: पारदर्शक असून कोणत्याही गैरप्रकारास थारा दिला जाणार नाही. ओळखीचे आमिष दाखवून किंवा पैशांची मागणी केल्यास तत्काळ पोलीस नियंत्रण कक्ष, पालघर (दूरध्वनी क्र. ०२५२५-२०५३०० / २०५३१४) तसेच पोलीस हेल्पलाईन क्रमांक ८६६९६०४००४ / ८६६९६०४०७० वर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी केले आहे.

Leave Your Comments