वसई पूर्व विभागासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुदीची मागणी

Date: 2026-02-17
news-banner
https://youtu.be/uZEa1AsgkPQ?si=hli2yyOvv3qm01t2

वसई पूर्व विभागासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुदीची मागणी; नवनिर्वाचित महापौरांचे सकारात्मक आश्वासन
वसई-विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या पूर्व विभागातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी बहुजन विकास आघाडीच्या शिष्टमंडळाने केली. महापौर अजिव पाटील यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेत आवश्यक कार्यवाहीचे आश्वासन दिले.
बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते काशिनाथ पाटील, माजी आमदार राजेश पाटील आणि माजी खासदार बळीराम जाधव यांच्या नेतृत्वाखाली वसई पूर्व पट्टीतील नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकाऱ्यांनी महापौर अजिव पाटील तसेच उपमहापौर मार्शल लोपीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
बैठकीदरम्यान पूर्व विभागातील वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणारा महसूल लक्षात घेता विकासकामांसाठी होत असलेली अपुरी आर्थिक तरतूद हा प्रमुख मुद्दा मांडण्यात आला. आगामी अर्थसंकल्पात पूर्व विभागासाठी प्रभाग समितीनिहाय भरीव निधीची तरतूद करून विकासकामांना गती द्यावी, अशी ठाम मागणी शिष्टमंडळाने केली.
गटारे, रस्ते, पाईपलाईन, दिवाबत्ती आणि साफसफाई यांसारख्या मूलभूत सुविधांची तातडीने अंमलबजावणी करणे, रस्त्यांवरील खड्डे बुजवून पॅचवर्कची कामे त्वरीत पूर्ण करणे, प्रलंबित आकारणी प्रक्रिया सुरू करणे, झोपडपट्ट्या व विविध वस्त्यांमध्ये नवीन नळजोडणी देणे तसेच आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देणे, या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
पूर्व विभागातील नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात आणि विकासकामांना नियोजनबद्ध गती मिळावी यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महापौर अजिव पाटील यांनी सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून पूर्व विभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
या बैठकीस माजी सभापती तथा नगरसेवक कन्हैया बेटा भोईर, नगरसेवक रमेश घोरकणा, सुनील आचोळकर, सदानंद पाटील, अजित भोईर, नगरसेविका अस्मिता पाटील, सुनंदा पाटील, निशा भोईर, नगरसेवक जयंत बसवंत, अरशद चौधरी, नगरसेविका दिपा पाटील, जोशना भगली, लता कांबळे, संतूर यादव, प्रसन्न भातानकर, योगिता पाटील, पंकज पाटील, सचिन देसाई, नीता घरत, प्रदीपिका सिंह यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave Your Comments